आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम नोकरी नसल्याने लग्न जुळण्यात अडचणी; विद्यापीठ निवडणूकीत मतदाराने मांडले भीषण वास्तव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जॉब सिक्युअर्ड असलेल्या मुलाशीच मुली लग्न करतात. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना प्रपंच चालवणे कठिण असते. मग नोकरी केव्हा मिळणार आणि लग्न कधी होणार ..? वय ३५ ते ४० होत आहे.’ असा भावनिक मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या मतपत्रिकेसोबतच्या पत्रात मतदाराने उपस्थित केला. दहा जागांसाठी गुरुवारी (७ डिसेंबर) मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्या वेळी ही मतपत्रिका सर्वांसमोर आली.

 

मार्च २०१७ रोजी लागू झालेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१६ नुसार पहिल्यांदाच विद्यापीठीय प्राधिकरणाच्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी पदवीधर अधिसभा व्यतिरिक्त पाच गटांतील निवडणुका होऊन त्याचा निकालही घोषित झाला आहे. पदवीधर मतदारसंघात २९ हजार मतदारांची नोंदणी आहे. १० जागांसाठी डिसेंबरला मतदान झाले. गुरुवारी अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीत सायंकाळी ७.१५ मिनिटांनी बीड जिल्ह्यातील पेटीत एका मतपत्रिकेला पत्र लिहिलेले आढळले. सामाजिक चळवळीशी नाळ जोडलेले विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ते मतमोजणी केंद्रातील एलईडीवर झळकवत ध्वनिक्षेपकावर वाचूनही दाखवले. त्या मतदाराने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून शैक्षणिक क्षेत्रातील वेठबिगारी निदर्शनास येते आहे. स्वतंत्र पत्राद्वारे मजकूर लिहिल्याने ही मतपत्रिका ग्राह्य धरण्यात आल्याचे डॉ. सरवदे यांनी सांगितले.

 

डॉक्टर्स, इंजिनिअर्स बेकार आहेत
‘आज ग्रॅज्युएट मुलाला कायमस्वरूपी नोकरी नसल्याने लग्नात अडचणी येतात. मुलगी म्हणते जॉब सिक्युअर्ड पाहिजे. हा मुद्दा जरी निवडणुकीचा नसला तरी आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विवाहेच्छुक अनेक मुला-मुलींचे वय विवाह जुळत नसल्यामुळे ३५ ते ४० झाले आहे. तरी कायम फिक्स पे का होईना जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, बीए, एमए, बीएस्सी, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम बेकार आहेत. बघा काही करता येते का..?’ असा आशय पत्रात आहे.

बातम्या आणखी आहेत...