आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेफर्सची नियम डावलून विक्री, उत्पादनांच्या दर्जाबाबत संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नियम धाब्यावर बसवून शहरातील किरकोळ बाजारात निर्मितीची कालबाह्यतेची तारीख नसलेले गोल्डन वेफर्स, स्टारच्या हजारो पाकिटांची विक्री केली जात आहे. काही कंपन्यांतर्फे खाद्यपदार्थांच्या पाकिटात दहा रुपये आणि खेळण्याचे साहित्य टाकून मुलांना आकर्षित केले जात आहे. याशिवाय बेकरीतील सुटी खारी, टोस्ट, पाव, उघड्यावरील मांस, मच्छी आदी खाद्यपदार्थांतून आरोग्याशीच खेळ सुरू आहे. याकडे अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ग्राहक संरक्षण संवर्धनासाठी सरकारच्या वतीने १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याशिवाय वर्षभर प्रचार आणि प्रसारावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यातून ग्राहकांत जागृती केली जाते. जिल्हानिहाय गलेगठ्ठ पगाराचे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करूनही शहर परिसरात बाहेरील जिल्ह्यात तयार झालेले निकृष्ट दर्जाचे वेफर्स, बेकरीचे खाद्यपदार्थ विक्री केले जात आहेत. बुधवारी मुकुंदवाडी, हनुमाननगर, रेणुकानगर, नारेगाव, शहागंज, रेल्वे स्टेशन, उस्मानपुरा भागातील २० दुकानांत जाऊन स्टिंग आॅपरेशन केले असता गोल्डन वेफर्स कंपनीच्या उत्पादन पाकिटावर तारीख नसलेली, कालबाह्यतेचा उल्लेख नसलेली वेफर्स पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मंगळवारीमाझ्या मुलाने गोल्डन वेफर्सचे पाकीट आणून वेफर्स खाल्ले. त्या पाकिटात दहा रुपयांची नोट होती. मी ते पाकिट बघितले. जागतिक ग्राहक दिन विशेष 'दिव्य मराठी'ची बातमी वाचली होती. त्यामुळे अधिक चौकशी केली असता पाकिटावर उत्पादनाची तारीख नसल्याचे निदर्शनास आले. मुलांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे मत अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर पाटील यांनी केली आहे. या भयानक प्रकाराला अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभाग जबाबदार आहे, पण त्यांचे लागेबांधे असल्यामुळे कारवाई होत नाही. सर्वसामान्यांच्या आरोग्यावरच घाला घालणारी अशी उत्पादने संबंधित विभागाने बंद करावीत आणि दोषींना अटक करावी, अशी मागणी विवेक वाकोडे या विद्यार्थ्याने केली.

उत्पादने बाजारात येतात कशी?
वेफर्सपाकिटावर इंग्रजीत माहिती दिलेली असते. ती कुणी वाचत नाही; पण याचा अर्थ असा होत नाही की कालबाह्य, निकृष्ट खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारावेत. ज्या कंपन्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत, त्यांची उत्पादने बाजारात येतातच कशी, असा सवाल शिल्पा शिंदे या महिलेने केला.

अधिकार उत्पादकांना कसा ?
जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार बोगस उत्पादकांना कोणी दिला? हे उत्पादन थांबवण्यासाठी सर्वस्तरांतून उठाव झाला पाहिजे. अन्न औषध प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग डोळे असून अांधळेपणाची भूमिका का घेत आहे, असा रोष पूजा देशमुख या महिला ग्राहकाने व्यक्त केला.

कंपनीतील खाद्यपदार्थांवर उत्पादन तारीख नाही : ए.के. वेफर्स पोटॅटो, गोल्ड वेफर्सचे चाऊमिन, एटीएम, टॉम अँड जेरी, सापशिडी, बालवीर यावर उत्पादन तारीख नाही. ज्यावर आहे ते कालबाह्य असल्याचे दिसून आले.
कोल्हापूर प्रॉडक्टवर संशय : स्टार५५५ कंपनीचे फनटन्स टोमॅटो, पोटॅटो चिप्स, फन व्हील्स, अालू भुजिया, फटाके यांच्यावरही निर्मिती एक्स्पायरी डेट नाही.
खाद्यपदार्थ विक्रीसाठी आमिष : दहा रुपयांची नोट, खेळण्याच्या साहित्याचे आमिष दाखवून अनेक खाद्यपदार्थ बच्चेकंपनीच्या माथी मारले जात आहेत.

चौकशी केली जाईल...
अन्नपदार्थ भेसळ, रसायनाचा वापर, निकृष्ट दर्जाची खाद्यपदार्थाची वारंवार तपासणी केली जाते. बाजारात कालबाह्य उत्पादन तिथी नसलेली पाकिटे तपासण्यासाठी निरीक्षकाला सांगतो. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. अशोकपारधी, सहायकआयुक्त, अन्न औषध प्रशासन.

मशीन बंद पडली होती
नारेगावला गोल्डन वेफर्सचा छाेटा कारखाना आहे. आठवड्यापासून मशीन बंद असल्यामुळे पाकिटावर उत्पादनाची तारीख नमूद करता आली नाही; पण यापुढे अशी चूक होणार नाही. आम्ही ताजे खाद्यपदार्थ तयार करूनच बाजारात पाठवतो. काजीम शेख, मालक,गोल्डन वेफर्स, नारेगाव.
बातम्या आणखी आहेत...