आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील विहिरी आता होणार स्वच्छ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाण्याचे शाश्वत स्रोत असलेल्या विहिरींच्या दुरवस्थेबद्दल ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील उपयुक्त विहिरी स्वच्छ करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. येत्या तीन दिवसांत अशा विहिरींतील पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. पाणी वापरण्यायोग्य असल्यास गाळ काढण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी गुरुवारी सांगितले.

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून अनेक पडीक विहिरी उपयुक्त ठरू शकतात, याकडे ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यासंदर्भात आंदोलन करून विहिरींच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर घेतला आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. गुंठेवारी भागात तर 87 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने मनपाला 9 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जुन, जुलै महिन्यात पाणी कमी पडू नये यासाठी युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासह शहरातील उपयुक्त विहिरींतील गाळ काढून ते पाणी वापरण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. या पाण्याचा वापर गार्डन, बांधकाम, घरकाम आदी कामांसाठी होऊ शकतो. तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरींचे संवर्धन व्हावे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येत्या पाच दिवसांत उपयुक्त विहिरीतील गाळ काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात 323 विहिरी आहेत. यापैकी ज्या विहिरींतून पाण्याचा वापर होऊ शकतो, अशा विहिरी स्वच्छ करून ते पाणी टँकरद्वारे शहरातील समस्याग्रस्त भागात पुरवण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.