आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 बहिणींचा एकुलता भाऊ हॉस्टेलवरून घरी आला होता, भिंत कोसळून असा झाला मृत्यू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारीच तो हॉस्टेलवरून घरी आला होता आणि सोमवारी निघणार होता. - Divya Marathi
शनिवारीच तो हॉस्टेलवरून घरी आला होता आणि सोमवारी निघणार होता.
वाळूज- घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत बांधलेल्या साडीच्या झोळीत बसून झोके खेळणाऱ्या बहीण-भावाच्या अंगावर भिंत कोसळली. त्याखाली दबून मुंजाजी सुरेश गाडगीळ (१२) रमा गाडगीळ (६) या बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला. याच घटनेत सरगम गाडगीळ (१०) ही किरकोळ जखमी झाली. चौघा बहिणींमध्ये एकुलता एक असणारा मुंजाजी शनिवारी होस्टेलहून घरी परतला होता आणि दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला.
 

दत्तनगरात शब्बीर पठाण यांच्या मालकीची जुनी दोनमजली इमारत आहे. खालच्या मजल्यावरील खोलीत सुरेश गाडगीळ (३९) हे मागील चार वर्षांपासून भाड्याने राहतात. वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत पती-पत्नी काम करतात. या दांपत्याला मुंजाजी (१२), सरगम (१०), श्रद्धा (८), रमा (६), संध्या (४) अशी मुले आहेत. घटनेच्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे अंगणात खेळण्यापेक्षा खोलीत साडीच्या साहाय्याने बांधलेल्या झोळीत बसून दोन्ही भावंडे खेळू लागली. साडीचे एक टोक खिडकीच्या लोखंडी रॉडला, तर दुसरे टोक भांडे ठेवण्यासाठी फरशी टाकून तयार केलेल्या भिंतीच्या रॅकला बांधून झोळी तयार केली होती. रविवारी सर्व भावंडे झोका खेळत होती. रमा झोका खेळत असताना मुंजाजी तिच्या शेजारी बसला. एवढ्यात पावसामुळे ओल धरलेली भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. वेळीच खोलीबाहेर पळाल्याने सरगम ही किरकोळ जखमी झाली. मोठा आवाज झाल्याने मुंजाजीचे आई-वडील शेजाऱ्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. तोपर्यंत भिंतीखाली दबून दोघांचा अंत झाला होता. समोरचे दृश्य पाहून आई-वडिलांनी टाहो फोडला. भिंतीखाली दबलेले मृतदेह उपसरपंच मोहिनीराज धनवटे, प्रभाकर महालकर, दीपक सदावर्ते, दीपक बडे आदींच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांत करण्यात आली आहे. 
 
मुंजाजी होता अभ्यासात हुशार 
गाडगीळपरिवार गंगाखेड तालुक्यातून (जि. परभणी) कामाच्या शोधात वाळूजला आला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरेश यांनी अभ्यासात हुशार असलेल्या मुंजाजीला चांगल्या शिक्षणासाठी होस्टेलवर ठेवले होते. त्याला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. सुटी असल्याने तो शनिवारी आई-वडिलांकडे आला होता. सोमवारी परत जाण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. 
बातम्या आणखी आहेत...