आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्डय़ावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासात मदत होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज महानगरातील तिसगाव येथील खवड्या डोंगरालगतच्या जुगार अड्डय़ावर गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात 15 जुगार्‍यांना अटक करून त्यांच्याकडून जुगार साहित्यांसह 1 लाख 82 हजार 760 रुपयांचा ऐवज जप्त केला होता. या जुगार अड्डय़ावर येणार्‍या ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांना तपासकामी मदत होणार आहे. त्यामुळे यापूर्वी या अड्डय़ावर जुगार खेळण्यासाठी येऊन गेलेल्या जुगार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

खवड्या डोंगराच्या शेजारील शेतीमध्ये असलेल्या खोल्यांमध्ये विष्णू लेखराज तनवाणी हा गेल्या अनेक दिवसांपासून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळवत होता. याबाबतची माहिती खबर्‍यामार्फत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याबाबतची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (12 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्रीनंतर जुगार अड्डय़ावर धाड टाकली.

त्यात जुगार खेळणार्‍यांसह अड्डा चालवणारा, अशा 15 जणांना रोख 1 लाख 82 हजार 760 रुपये रकमेसह ताब्यात घेतले होते.

धोकेबाजी होऊ नये यासाठी सीसीटीव्ही
अड्डय़ावर जुगार खेळण्यासाठी येणार्‍या जुगार्‍यांनी धोकेबाजी क रू नये, यासाठी अड्डामालक विष्णू तनवाणी याने ज्या ठिकाणी जुगार खेळवला जात होता, त्या खोलीत चहूबाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे सर्व कॅमेरेही ताब्यात घेण्यात आले आहेत. कॅमेर्‍यांच्या हार्डडिस्कमध्ये कमीत-कमी महिनाभराचे चित्रीकरण संग्रहित होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेले सीसीटीव्ही कॅमेरे व त्याच्या हार्डडिस्क अनेक जुगार्‍यांचे पितळ उघडे करणार आहे. जे जुगारी महिनाभराच्या कार्यकाळात येथे येऊन गेले, त्या सर्वांचे चित्रीकरण त्यात असल्याने पोलिसांना त्याची तपासात मोठी मदत होणार असल्याने पूर्वी जुगार खेळण्यास गेलेल्या जुगार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलिस उपनिरीक्षक सुरेश खाडे तपास करीत आहेत.