आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज : रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 14 घरे अर्धवट पाडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता करोडीतील दोन ग्रामपंचायत सदस्यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली गावातील 14 ग्रामस्थांच्या घरांचा अशंत: भाग जेसीबी यंत्राद्वारे रविवारी (8 डिसेंबर) जमीनदोस्त केला. विशेष म्हणजे ही कारवाई ग्रामपंचायतीने नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांनी गैरकायदा केल्यामुळे या सदस्यांविरुद्ध मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदवण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी (10 डिसेंबर) करण्यात आली आहे.
करोडी-साजापूर ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत करोडी हे गाव येते. रविवारी कुठलीही तोंडी किंवा लेखी सूचना न देता ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गोल्हार, देविदास गवंदे यांनी स्वत: उभे राहून रुंदीकरणात अडथळा ठरणार्‍या 14 मालमत्तांवर बुलडोजर फिरवले. या पक्क्या घरांचा अंशत: भाग पाडण्यात आला. ही घरे कुठल्या नियमांच्या आधारे पाडण्यात आली असा सवाल या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पडलेल्या घरांचा पंचनामा करावा, गरीब लोकांवर अन्याय झाल्याने वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, घरे पाडून नुकसान करण्यास कारणीभूत ठरलेले ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गोल्हार व देविदास गवंदे यांचे सदस्यत्व रद्द करावे तसेच संबंधितांवर फ ौजदारी स्वरूपांचे गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.
यांची पाडली घरे : बापूराव दवंडे, करण गायकवाड, दत्तू सांगळे, राजू राजपूत, सुभाष जाधव, विजय जाधव, क ाशीनाथ जाधव, शामराव दवंडे, रंभाजी नवपुते, विठ्ठल जाधव, अयुब शेख, शेषराव गायकवाड, जालिंदर भुजबळ, विष्णू जाधव अशी 14 जणांची घरे पाडण्याची बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कारवाईशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही
8 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत करोडी ते मुंबई हायवे रस्त्यावरील रहदारीला अडथळा करणारी घरे अंशत: पाडण्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली होती. मात्र, संबंधित घरमालकाला नोटिसा बजावून घरे पाडण्याचे ठरले होते. ही प्रक्रियाही सुरूही झाली नव्हती. माझ्या, सरपंच व उपसरपंचांच्या गैरहजेरीत ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे या कार्यवाहीशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही.
मनीष अमुलगीकर, ग्रामसेवक
शौचालयही सोडले नाही
घरालगत वैयक्तिक अनुदानित शौचालय बांधले होते. या मोहिमेत तेही जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या पाणंदमुक्त मोहिमेला ग्रामपंचायत सदस्यांनीच हरताळ फ ासल्याचे समोर येत आहे. -रुख्मणबाई बापूराव दवंडे, ग्रामस्थ
अवघ्या काही वर्षांपूर्वी सुमारे दोन लाख रुपये खर्च क रून घराला वॉलकंपाउंड बांधले होते.रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली साधी सूचनाही न देता हे वॉलकंपाउंड जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी. रंभाजी नवपुते, ग्रामस्थ करोडी
रस्त्याला अडथळा ठरणारी घरे ग्रामस्थांना विनंती क रून पाडायची असे ठरले होते. त्यासाठी वापरलेली पद्धत अत्यंत चुकीची आहे. घरमालकांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. कलीम सय्यद, उपसरपंच करोडी-साजापूर ग्रामपंचायत