आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूज एमआयडीसी झाले मद्य महानगर; पोलिस, एक्साइजला ‘बाटली’त उतरवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाळूज अवैध धंद्यांचे महानगर म्हैणून पुढे येत आहे. त्यात खुलेआम बेकायदा दारू विक्रीची भर पडली आहे. टपर्‍या आणि दुकानांवर सहज दारू मिळते आणि ती थेट रस्त्यावर रिचवली जाते. यामुळे या वसाहतीतील उद्योजक, नागरिक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे बिअर बार, वाइन शॉपची संख्या वाढत असून रात्री-बेरात्री सुरू राहणार्‍या या अड्डय़ांवर उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नाही. डीबी स्टारने केलेल्या तपासात अनेक ठिकाणी अनधिकृत मद्याचे अड्डे आढळून आले आहेत. रोज सुमारे दीड लाख लिटर मद्याची बेकायदा पद्धतीने विक्री होत आहे. शिवाय यातून सरकारचा कोट्यवधींचा महसूलही बुडत आहे.

शहरात 1981 मध्ये वाळूज औद्योगिक वसाहत उदयाला आली. या ठिकाणी लहान-मोठे सुमारे अडीच हजार उद्योग आहेत. संपूर्ण भारतातून येथे पोट भरण्यासाठी जवळपास दीड लाख लोक आले आहेत. यात सर्वाधिक संख्या कामगारांची आहे. त्या अनुषंगाने बजाजनगर, वडगाव, जोगेश्वरी, पंढरपूर आदी वसाहती उभ्या राहिल्या. या परिसरात बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक राहतात. सध्या या ठिकाणी खुलेआम मद्यविक्री होत असल्याने हे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.

ओअँसिस चौकात भरते ‘शाळा’

उद्योगनगरीत जाण्यासाठी ओअँसिस चौकातून जावे लागते. शहरातून मोठय़ा प्रमाणात उद्योजक व कामगारांना जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. येथे ऐन चौकात वाइन शॉप आहे. संध्याकाळी हा चौक तळीरामांचा अड्डाच बनतो. वाइन शॉपसह येथील लहान-मोठय़ा टपर्‍यांवर अनधिकृतरीत्या मद्यविक्री केली जाते. त्यामुळे संध्याकाळी या चौकात दारुड्यांची जत्रा भरते. सायंकाळी येथून जा-ये करणार्‍या महिलांची कुचंबणा होते. अनेक वेळा मद्यपी महिलांची छेड काढतात. परिसरात जाण्यासाठी महाराणा प्रताप चौक आहे. या चौकात दुपारपासून तळीरामांची ‘शाळा’ भरते.

अनेकांशी मद्यपींची झटापट

तिरंगा चौकातून कंपनीत जाणारे उद्योजक, डॉक्टर व कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना मद्यपींचा सामना करावा लागतो. अनेकदा गाडीला आडवे होऊन अश्लील शिव्या दिल्या जातात. कुणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यास हा प्रकार मारहाणीपर्यंत जातो. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तेवढय़ापुरती थातूरमातूर कारवाई होते. दुसरी बाब म्हणजे शुक्रवारी बहुतांश लोकांना सुटी असते. आठवडी पगार मिळाल्यावर कित्येक मद्यपी प्यायला बाहेर पडतात. या दिवशी खुलेआम टपर्‍या व दुकानांवर दारू रिचवली जाते.

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल ‘फुल्ल ऑन’

ओअँसिस चौक ते कोलगेट कंपनीपर्यंत रस्त्यावर 25 लहान-मोठय़ा हॉटेल्स आहेत. बजाजनगर परिसरात मध्यवस्तीत जवळपास 15 रेस्टॉरंट आहेत. परिणामी मध्यरात्रीपर्यंत तळीरामांचा धांगडधिंगा सुरू असतो. अति मद्यसेवन करून मद्यपींची रोज भांडणे होतात. तशा अनेक तक्रारी पोलिस परस्पर सेटिंग करून घेतात. त्यामुळे या तक्रारी दाखलही करून घेतल्या जात नाहीत.

व्यसनमुक्ती नावालाच

वाळूज परिसरात एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. केवळ व्यसनमुक्तीच्या नावावर वर्षातून एखादा दुसरा कार्यक्रम घेतला जातो.

तळीरामांची दहशत
ओअँसिस चौकातून संध्याकाळी जाणे म्हणजे एक संकटच असते. मद्यपी भर रस्त्यावरच लोळतात, कुठेही उभे राहून लघुशंका उरकतात. एवढेच नव्हे, तर अश्लील शिव्यांची लाखोली वाहतात. कित्येक वेळा भांडणे उकरून काढतात. त्यामुळे या चौकातून जाताना खूप काळजी घ्यावी लागते.
शोभाबाई जाधव, स्थानिक रहिवासी

पोलिसांशी साटेलोटे
अनधिकृत मद्यविक्री करणार्‍यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे. पोलिसांनी मनावर घेतले तर हे धंदे बंद होऊ शकतात, परंतु पोलिसांचे आणि मद्यविक्री करणार्‍यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे हा प्रकार थांबणे शक्य नाही.
राजेश पठाडे, स्थानिक कार्यकर्ते

संसार उद्ध्वस्त होताहेत
दारूची खुलेआम विक्री आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने तळीरामांना कुणाचाच धाक राहिलेला नाही. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
शेख नसीमबी, स्थानिक महिला
ग्रामपंचायत जबाबदार
भरवस्तीत अनेक बिअर बार व बिअर शॉपींना ग्रामपंचायतींनी एनओसी दिल्या. नागरी वसाहतीचा यात विचार केला गेला नाही. परिणामी महिला, उद्योजकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जनतेने साथ दिल्यास मोठे आंदोलन उभारू.
अनिल चोरडिया, जि. प. सदस्य, वडगाव सर्कल

नियमानुसारच बार चालतात
नियमानुसारच रात्री उशिरापर्यंत बार चालतात
आम्ही पोलिस ठाणे व दारूबंदी कार्यालयाला सातत्याने तक्रारी करतो. अनधिकृत मद्यविक्री होत असल्याने याचा त्रास सामान्यांना होतोच, शिवाय शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो आहे. वाळूज परिसरातील बिअर बार शासनाच्या नवीन नियमानुसारच रात्री 1 वाजेपर्यंत चालतात.
दिलीप बनकर, अध्यक्ष, एमआयडीसी बार असोसिएशन, वाळूज

हा त्रास असह्य झाला
मद्यपींच्या उच्छादामुळे ओअँसिस चौकातील आमच्या दुकानात ग्राहक येणे कमी झाले. कर्मचार्‍यांसह ग्राहकांबरोबर नेहमी मद्यपींची भांडणे होतात. आता हा त्रास आम्हा व्यावसायिकांना असह्य झाला आहे.
अभय समधरिया, व्यावसायिक

थातूरमातूर कारवाई
जेव्हा उद्योजक किंवा महिलांना त्रास होतो तेव्हा थातूरमातूर कारवाई केली जाते. थेट वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठोस पावले उचलावीत. जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत.
वसंत वाघमारे, सदस्य, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन

कामावरही परिणाम होतो
रस्त्यावर मद्यविक्री होऊ नये, असा नियम आहे; परंतु याबाबत कुणीही गांभीर्याने घेत नाही. पोलिसांना मद्यपींचा उपद्रव थांबवण्याचे काम करायला हवे. याचा थेट परिणाम कामावरही होतो. पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी.
अर्जुन गायके, माजी अध्यक्ष, सीएमआयए

उत्पादन शुल्क व पोलिसांची ‘माया’
अधिकृत परवाना असलेले बार, बिअर शॉपी व वाइन शॉपला 2011- 12 पर्यंत वार्षिक नोंदणी फी 1 लाख 80 हजार इतकी होती. 10 लाख लोकसंख्येच्या निकषानुसार ही फी आकारली जाते. दरम्यान, सरकारने केलेल्या जनगणनेत शहराची लोकसंख्या 15 लाखांपर्यंत गेली. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने वार्षिक फी नियमानुसार दुप्पट करून ती 2 लाख 83 हजार इतकी केली. परिणामी अधिकृत मद्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अप्रत्यक्षरीत्या सरकारचा महसूल बंद होऊ नये व बिअर बार चालकांचा धंदाही बंद होऊ नये म्हणून मधला मार्ग काढत एक तासाची वेळ दारू विक्रेत्यांना अधिक देण्यात आली. या अनधिकृत निर्णयामुळे शासन आणि चालकांचे चांगभले झाले, मात्र त्याचा थेट परिणाम दारू दुकाने असलेल्या परिसरांमध्ये झाला.

थेट सवाल
काय म्हणतात मान्यवर आणि नागरिक

आर. एस. चौधरी,
दारूबंदी अधिकारी, वाळूज क्षेत्र

वाळूज परिसरात अवैध दारूविक्री केली जाते?
याबाबत विभागामार्फत सातत्याने कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वीच कारवाई केली.
आपल्या हद्दीत किती दुकाने आहेत?
वडगाव व बजाजनगर परिसरातील एकूण 40 हॉटेल्स येतात. यावर नेहमी विभागाचे लक्ष असते.
अनधिकृत हॉटेल्सवर ठोस कारवाई का होत नाही?
आमची मोहीम सातत्याने सुरू असते.

परिसरात दुकाने नकोत
औद्योगिक वसाहतीत मद्यविक्रीची परवानगी द्यायला नको. जी पूर्वीची दुकाने आहेत त्यांच्याबाबत समस्या असतील तर लोकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आम्हाला कळवावे. याविषयी स्थानिक पातळीवर कारवाई न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करू. प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेऊन कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई करावी, अशी आमची भूमिका आहे.
मिलिंद कंक, अध्यक्ष, सीएमआयए

निदर्शनास आल्यास कारवाई करू
मुळात या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचे काम दारूबंदी कार्यालयाचे आहे. तरीही परिसरात कुठेही अशी अवैध मद्यविक्री होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले किंवा तशा तक्रारी आल्यास आम्ही निश्चितच कडक कारवाई करू.
किशोर नवले, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी ठाणे