आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 हजारांच्या तोंडचे पाणी पळवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बड्या कंपन्यांनी सोडलेल्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वाळूज परिसरातील पाच गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जोगेश्वरीतील भला मोठा तलावच पूर्णपणे प्रदूषित झाला आहे. भूगर्भात हे विषारी पाणी खोलवर मुरले आहे. डीबी स्टारने सर्व पातळ्यांवर तपास केला असता या पाण्यात अत्यंत घातक घटक आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे या पाण्यात विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आढळले. त्यामुळे ते पिण्यायोग्य व वापरण्यायोग्यही राहिलेले नाही. साधारण 75 हजार लोकांच्या तोंडचे पाणी पळवण्याला जबाबदार कोण, त्याचे परिणाम काय आणि उपाय कोणते याबाबत वृत्तमालिका.

वाळूज परिसरात वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, कासोडा आणि जोगेश्वरी ही पाच गावे आहेत. पाचही गावे मिळून जवळपास 70 ते 75 हजार लोकवस्ती आहे. मात्र, दूषित पाण्यामुळे ही सगळी गावे व वसाहतीच हलवण्याची वेळ एक दिवस येऊ शकते, इतके हे प्रदूषण भयंकर आहे. डीबी स्टार चमूने या सगळ्या गावातील शेतांची, विहिरींची, ओढय़ांची आणि तलावांची 5 दिवस पाहणी केली तेव्हा सर्वत्र रसायनयुक्त पाणी आढळले. वर्षानुवर्षे हे पाणी खोलवर मुरले असून त्याच धोकादायक पाण्यावर शेतकर्‍यांना पिके घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. ग्रामपंचायत यासाठी कंपन्यांना जबाबदार धरते. तज्ज्ञदेखील रसायनामुळे प्रदूषण झाल्याचे सांगतात. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाला मात्र ड्रेनेजच्या पाण्यामुळे प्रदूषण झाल्याचा साक्षात्कार झाला आहे.

अख्खा तलाव रसायनयुक्त
वाळूजमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प गेल्या वर्षभरापासून सुरू झाला आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी तेथे सोडले जाते; पण काही कंपन्या अजूनही शोषखड्डे किंवा नाल्यात सांडपाणी सोडतात. तेच रसायनयुक्त पाणी शेवटी जोगेश्वरी गावातील रामराई तलावात (परदेशवाडी तलाव) मुरून हा तलाव पूर्णत: प्रदूषित झाला आहे.

पाण्यातील ऑक्सिजन गायब
जोगेश्वरी गावातील तलाव प्रचंड मोठा आहे. भरउन्हाळ्यातही तो तुडुंब भरलेला असतो. रसायनांमुळे हिरव्या झालेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पाण्याची चाचणी घेतली असता तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य झाल्याचे स्पष्ट झाले. पाण्यातले जीवनच हरवल्याने त्यात सजीव प्राणी जिवंत राहूच शकत नाहीत. मासे केव्हाच गायब झाले असून प्राणी व पक्षीसुद्धा हे पाणी पिऊ शकत नाही.

हापसा, विहिरींचे पाणी हिरवे झाले
रसायनयुक्त पाणी वर्षानुवर्षे मुरल्याने या सर्वच गावांतील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी, गावकरी विहीर किंवा हापशाचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. सर्वच ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे त्यांना महिन्याला एक ते दीड लाख रुपये खर्च करावे लागतात.

ग्रामपंचायतीच्या असंख्य तक्रारी
या प्रकरणी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असंख्य तक्रारी केल्या आहेत. यासाठी जबाबदार कंपन्यांचे पुरावेदेखील दिल्याचे सरपंच योगेश दळवी यांनी सांगितले. मात्र, संबंधित विभागाने फक्त तोंडदेखली कारवाई करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर कंपन्या मोकाट आहेत.

याला पाणी कसे म्हणावे?
ज्या पाण्यात विद्राव्य ऑक्सिजन नाही त्याला पाणी कसे म्हणता येईल? एचटूओमधला ओ गायब होऊ शकतो, यावर विश्वास बसत नाही. - डॉ. प्रवीण वक्ते,विभागप्रमुख, केमिकल टेक्नॉलॉजी

चर्मरोग होण्याचा धोका
तलावातले पाणी अल्कलीयुक्त आहे. पाण्याचा पीएच 7.0 हवा त्याला न्यूट्रल म्हणतात. तो सातच्या आत असेल तर आम्लाचे प्रमाण जास्त असते. या पाण्याचा पीएच 8.12 असल्याने ते अल्कलीयुक्त आहे. यामुळे त्वचा कोरडी पडते. खाज सुटून ती खराब होण्यास सुरुवात होते. या पाण्यामुळे विविध चर्मरोग होऊ शकतात.- डॉ. आशिष देशमुख,त्वचारोगतज्ज्ञ

रसायनांनीच दूषित केले
या पाण्याचे निष्कर्ष पाहून धक्काच बसला. केमिकल व फार्मा कंपन्यातून जाणार्‍या पाण्यातच असे घटक आढळून येतात. युद्ध पातळीवर हा तलाव स्वच्छ केला पाहिजे. तलावाकडे येणारे रसायनांचे पाणी थांबवलेच पाहिजेत. तलावातल्या पाण्यात ऑक्सिजनच नाही. पाण्यात अत्यंत घातक घटक असल्याने ते पिण्यायोग्य तर नाहीच, पण वापरण्यासही योग्य नाही. विविध रोगांना आमंत्रण देणारे हे पाणी आहे. पाण्यात 0.0002 टक्के सायनाइड आहे. त्यामुळे ते विषारीच म्हटले पाहिजे.
-डॉ. सतीश पाटील, - प्राध्यापक, पर्यावरणशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

तलावाला भेट देतो
मला या तलावाविषयी माहिती नाही. या प्रकरणी गंभीर दखल घेणार असून या तलावाची पाहणी करतो. - विक्रमकुमार, जिल्हाधिकारी

थेट सवाल - योगेश दळवी सरपंच, जोगेश्वरी ग्रा.पं.
0 तलावातले पाणी इतके दूषित कसे झाले?
महिन्यात वा वर्षभरात हा प्रकार झालेला नाही. वाळूज उद्योग वसाहत झाल्यापासून अनेक कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी येऊन तेथे खोलवर मुरले आहे.

0 तुम्ही काय उपाय केले?
प्रदूषण नियंत्रण मंडळासह कंपनी व्यवस्थापनांकडे अनेक तक्रारी केल्या, पण उपयोग होत नाही. त्यामुळे आता मोठे आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे.

0 शासकीय स्तरावर तक्रार का नाही केली?
आम्ही शेवटी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत, कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांची बदली झाली अन् प्रदूषण मंडळाचे अधिकारी मोहेकरही बदलून गेले. त्यामुळे हा विषय तसाच राहिला. जबाबदार कंपन्यांवर फौजदारी दाखल करावी, अशी आमची मागणी आहे.

थेट सवाल - प्र. म. जोशी, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ
0 वाळूज परिसरात भूजल भयंकर प्रदूषित आहे..
हे प्रदूषण खूप वर्षांपासूनचे आहे. ते एकदम कमी होणार नाही. जमिनीत भरपूर प्रमाणात शुद्ध पाणी गेले तरच ते समूळ नाहीसे होईल.

0 जमिनीतील पाणीही हिरवे झाले आहे.
ते खरे आहे. आम्हीच ती चाचणी करून दिली आहे. दोन वषर्ा्ंपूर्वीसारखी स्थिती आता नाही. ग्रामपंचायतींनी ड्रेनेज सिस्टिम करावी म्हणजे तलाव व इतर पाणी दूषित होणार नाही.

0 प्रदूषण नाही तर मग हे अहवाल काय सांगतात?
उच्च् न्यायालयाच्या आदेशाने एक समिती स्थापन झाली आहे. त्यामुळे आता वाळूजसाठी युद्ध पातळीवर प्रदूषणमुक्त गावे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याच कंपन्या आता थेट नाल्यात, तलावात किंवा विहिरीत सांडपाणी सोडत नाहीत. आता ग्रामस्थांचे ड्रेनेजचे पाणी प्रदूषण वाढवत आहे. त्याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे.

0 सरपंच म्हणतात तुमचे कार्यालय लक्ष देत नाही.
आरोप-प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार नाहीत. हा प्रत्येकाने लक्ष देण्यासारखा विषय आहे. आम्ही आमचे काम चोखपणे करतो आहोत. कंपन्यांच्या सांडपाण्यावर बारीक लक्ष आहे. आम्ही वारंवार नोटीस देत असतो. त्यामुळे बराच फरक पडलाय

0 यावर उपाय काय?
हा तलाव हटवला पाहिजे, नाही तर त्यातला गाळ पूर्णपणे काढला तरच त्यात चांगले पाणी येईल.सर्वांनी मिळून काम केले तर वाळूज प्रदूषणमुक्त होईल.