आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीमंडईसाठीच्या जागेचा निर्णय मुंबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर परिसर व जयभवानी चौकातील रस्त्यांवर भरत असलेल्या भाजीमंडईमुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. मात्र, पर्यायी जागा नसल्याचे भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. वडगावालगत सिडको प्रशासनाने भाजीमंडई उभारली असली, तरी वापराअभावी ती बकाल झाली आहे. भाजीमंडईत शेतकरी-स्थानिक यांच्यात होणारे वाद, अरुंद रस्त्यांमुळे रहदारीला होणारी अडचण याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे परिसरात प्रशस्त भाजीमंडईसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध क रून देण्याची मागणी नागरिक व भाजी विक्रेत्यांकडून होत आहे.
परिसरातील वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यावर मंडई भरते. त्यामुळे सकाळ-सायंकाळ रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी ही भाजीमंडई इतरत्र हलवण्याची मागणी जोर धरत आहे.
जागेचा प्रस्ताव मुंबईत
परिसरातील आठ गावांमधून शेतकरी मोठय़ा प्रमाणावर भाजी विक्रीसाठी बजाजनगरात येतात. त्यामुळे कित्येकदा स्थानिक विक्रेते व शेतकरी यांच्यामध्ये वाद होतात. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाकडून बजाजनगर परिसरात भाजीमंडईला प्रशस्त जागा उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न आमदार संजय शिरसाट यांच्यामार्फत ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. सदरील प्रश्न मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईत त्यावर बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर बजाजनगर परिसरात भाजीमंडईला जागा देण्यासंदर्भात शिक्कामोर्तब होईल.
विक्रेते व शेतकर्‍यांमध्ये वाद
परिसरातील करोडी, आसेगाव, तिसगाव, घाणेगाव आदी भागांतील शेतकरी त्यांच्या शेतातील फळ-भाज्या विक्रीकरिता बजाजनगरच्या मंडईत घेऊन येतात. स्थानिक विक्रेत्यांपेक्षा कमी भावाने भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे परिसरातील महिला ग्राहक त्यांच्याकडूनच खरेदी करतात. यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा येते. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये नेहमीच वाद होत आहेत.
सिडकोची भाजीमंडई ओस
सिडको प्रशासनाने वडगावालगत प्रशस्त भाजीमंडई उभारली. मात्र, सदरील मंडई परिसरात रहिवासी वसाहत कमी प्रमाणात आहे. परिणामी, विक्रेत्यांनी या मंडईकडे पाठ फिरवली. त्यामुळे ही मंडई वापराअभावी ओस पडली आहे.
लवकरच जागा मिळणार आहे
ग्रामपंचायतीने वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यासाठी आमदारांची मदत घेऊन हा प्रश्न वरिष्ठ कार्यालयात दाखल करण्यात आला आहे . भाजीमंडईसाठी लोकवस्तीजवळ जागा एमआयडीसीने उपलब्ध करून दिली तरी ती विकसित करण्याची जबाबदारी घेण्यास ग्रामपंचायत तयार आहे.
छाया कारले, सरपंच, वडगाव कोल्हाटी
विनाकारण वाद होतात
या भाजीमंडईतून नेहमीच दुचाकीवरून जावे लागते. सकाळच्या वेळेपेक्षा सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठी अडचण निर्माण होते. दुचाकी फारच सावधगिरीने चालवावी लागते. मंडईत महिला अधिक असतात. थोडा धक्का लागला, तर विनाकारण वाद होतात. त्यामुळे ही मंडई इतरत्र स्थलांतरित करणेच योग्य आहे.
रवी जोगदंड, नागरिक
उपासमारीची वेळ येईल
दुकाने थाटताना सर्वांनी प्रोत्साहन दिले. आता मात्र ते इतरत्र हलवण्याचा विचार करत आहेत; परंतु नव्या जागेत ग्राहक आले नाही, तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. मग आम्ही काय करावे ?
लक्ष्मीबाई जाधव, भाजी विक्रेत्या