आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरी वाढवण्यासाठी काम बंद केले; भूक थांबवता आली नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - महागाईमुळे तुटपुंज्या मजुरीत घरखर्च भागवणे शक्य होत नाही. काम देणार्‍यांकडे अनेक वेळा मजुरी वाढवून देण्याची विनंती केली, पण वाढीव मजुरी मिळाली नाही. त्यामुळे कामावरही जाणे थांबवले. मात्र, भुकेमुळे पोटात होणारी कालवाकालव थांबवणे शक्य झाले नाही. त्यामुळे कामावर परतावे लागले. हे हताश उद्गार आहेत वाळूजच्या महावीर चौकात भरणार्‍या मजुरांच्या बाजारातील एका मजुराचे.

पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात असणार्‍या मजुरांचा वाळूजच्या महावीर चौकात दररोज बाजार भरतो. येथून पाहिजे तेवढे मजूर त्यांचा मोबदला ठरवून घेऊन जायचे. दिवसभर त्यांच्याकडून काम करून घेऊन सायंकाळी त्यांची मजुरी त्यांच्या हातात द्यायची. परंतु माथाडी कायद्याच्या निम्मे मजुरीही या मजुरांना मिळत नाही. किमान दरदिवशी सव्वादोनशे रुपये द्यावेत अशी अट या कायद्यात आहे. शेकडोच्या संख्येने येथे जमणार्‍या सर्व मजुरांना दररोज काम मिळतेच असे नाही. अनेक वेळा रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ येते. दुसर्‍या दिवशी तरी काम मिळेल, या आशेवर तो रोजचे जिणे जगत असतो.

कधी कधी त्याची चूलही पेटत नाही. एमआयडीसीतील विविध कारखान्यांमध्ये मालाची ने-आण केली जाते. कारखान्यांच्या विस्तारीकरणाची कामे केली जातात. ही कामे अंगमेहनतीची असल्याने कंपन्यांना तात्पुरत्या मजुरांची गरज असते. कामाच्या स्वरूपावरून देय रक्कम ठरवली जाते. पण माथाडी कायद्यानुसार त्यांना दररोज किमान सव्वादोनशे रुपये मजुरी मिळणे अपेक्षित असताना ठेकेदार, कारखानदारांकडून केवळ शंभर ते दीडशे रुपये देऊन या मजुरांची बोळवण केली जाते. मिळेल ते काम क रून हे मजूर तुटपुंजी मजुरी पदरात पाडून घेतात. कुटुंबाची गुजराण करण्याच्या उद्देशाने देशाच्या कानाकोपर्‍यातून वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठय़ा प्रमाणावर तरुण, सुशिक्षित बेरोजगार आले आहेत. मात्र प्रत्येकाला कंपनीत नोकरी मिळेल याची हमी नसल्याने अनेकांची घोर निराशा झाली. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी ही तरुणाई पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवून महावीर चौकात जमा होऊ लागली कारखानदार, ठेकेदारांनाही हे स्थळ ठाऊक असल्याने ते येथे येऊन मजुरांची निवड करतात.

मजुरांसाठी माथाडी कायदा व बोर्डही आहे. हे बोर्ड कारखान्यांना मजुरांचा पुरवठा करते. मजुरांना नियमानुसार पेन्शनही मिळते. मात्र, माथाडी कामगारांचा असंघटितपणा व लाचारीचा फायदा कारखानदार उचलतात. ते असंघटित मजूर तरुणांना काम देतात. तुटपुंजी मजुरी दिली जाते. योग्य मजुरी न मिळाल्यामुळे अनेक तरुण नाइलाजाने गुन्ह्यांकडे वळतो. मजुरांनी संघटित होऊन लढा दिल्यास आयटक त्यांच्या पाठीशी उभी राहील. - कॉ. बुद्धिनाथ बर्‍हाळ, नेते, भाकपप्रणीत आयटक कामगार संघटना

मजुरांचा कामासाठी ठिय्या
सकाळी या ठिकाणी तुम्ही आलात, तर तुम्हाला बेरोजगारी काय असते हे दिसेल? येथे तब्बल अडीचशे ते तीनशेवर मजूर कामासाठी ठाण मांडून बसलेले दिसतात. प्रत्येक जण काम मिळण्यासाठी आतुर झालेला असतो. कामाला घेण्यासाठी एखादा ठेकेदार आला तर त्याच्याकडे मजूर धावून जातात. - बालचंद नाडे, साठेनगर, वाळूज

भुकेल्या पोटाची काळजी
महागाईमुळे तुटपुंज्या मजुरीत घरखर्च भागवणे शक्य होत नाही. काम देणार्‍यांकडे अनेक वेळा आम्ही मजुरी वाढवून देण्याची मागणी केली. कामावरही जाणे थांबवले. मात्र, भुकेमुळे पोटात होणारी कालवाकालव मला थांबवणे शक्य झाले नाही. त्यामुळे कामावर परतणे भाग पडले. - जितेंद्र वाघ, पंढरपूर, झोपडपट्टी