आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक राज्यात एनएसडीच्या शाखा उभारणार : वामन केंद्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नाटकाचे सवरेत्तम प्रशिक्षण देऊन दमदार कलावंत निर्माण करणारी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ ही संस्था नाट्यचळवळीपासून दुरावली आहे. नाट्यचळवळीला गतिमान करण्यासाठी प्रत्येक राज्यात संस्थेच्या शाखा उघडण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे मत संस्थेचे संचालक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.
मिफ्ता पुरस्काराचे मानकरी आणि प्रसिद्ध नाटककार अजित दळवी व प्रख्यात कवी दासू वैद्य यांचा परिवर्तन संस्थेकडून रविवारी गोविंदभाई कला अकादमी सभागृहात सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. सोहळय़ाला प्रतापराव बोराडे, डॉ. भालचंद्र कांगो यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेवर संचालक म्हणून नियुक्त झाल्यानंतर संस्थेत प्रशिक्षण घेणार्‍यांची संख्या अत्यल्प पाहून वाईट वाटले. देशातील 25 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन ही चळवळ सक्षम राहू शकत नाही. पुढील वर्षी संस्थेचे प्रशिक्षण शिबिर मराठवाड्यात घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रे यांनी दिले.
कलावंतांना उमेदीच्या काळात आणि त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी पुरस्कार मिळाल्यास त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहन मिळते. मराठवाड्याची माती उत्तम कलावंत देणारी आहे. या भागातील कलावंतांनी वेळोवेळी हे सिद्ध केले आहे. मात्र, मराठी कलावंत पुरस्कारापासून दूर असतात. कमलाकर सोनटक्के यांनी मराठवाड्यासाठी नाट्याचे प्रशिक्षण केंद्र उभे केले आणि कलावंतांना मुंबईची वाट दाखवली. पण त्यांना वयाच्या 80 व्या वर्षी पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या निवड समितीत मी सदस्य होतो आणि पुरस्कारासाठी निमित्त ठरलो याचे समाधान वाटते. मराठवाड्याला हा पुरस्कार मिळाला याचा गौरव वाटतो. आईची पोळी आणि घरच्यांनी आपल्या कर्तृत्वासाठी वाजवलेली टाळी याला मोल नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या वेळी दासू वैद्य व अजित दळवी यांच्या साहित्यकृतीवरील अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. लक्ष्मीकांत धोंड, र्शीकांत उमरीकर व पद्मनाभ पाठक यांचा यामध्ये सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन फुले यांनी केले.