आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waquf Board Works : One Tree Permission, But Three Trees Cut

वक्फ बोर्डाचा अजब कारभार : एका झाडाच्या परवानगीवर तीन झाडांवर घाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परवानगी एकाने घेतली, नाव दुसर्‍याचे वापरले आणि झाडे तिसर्‍याच ठिकाणची तोडली..उस्मानपुर्‍यातील ईदगाह परिसरात असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेसमोर दोन वृक्षांवर घाव घालण्यात आले. किडलेले एक वडाचे झाड मनपाची परवानगी घेऊन तोडण्यात आले, मात्र ज्या वक्फ बोर्डाच्या जागेवरील हे झाड होते त्या बोर्डाच्या प्रमुखांची परवानगी झाड तोडणार्‍याने घेतली नसल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे एका माणसाने आपल्याच अंगणातील 3 नारळाची झाडे परवानगी न घेता तोडली व रखरखत्या उन्हात थंडावा देणारी झाडे तोडून पर्यावरणाला हानी पोहोचवली.

उस्मानपुरा परिसरात राज्य वक्फ बोर्डाची जागा आहे. त्यातील वडाचे झाड धोकादायक झाले होते. ते तोडण्याची परवानगी घेण्यात आली. तारा पान सेंटरचे संचालक शरफूभाई यांनी ही परवानगी घेतली होती. फेब्रुवारी 2013 मध्ये यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी प्रत्यक्ष वडाच्या झाडाची स्थळ पाहणी करून सप्टेंबर 2013 मध्ये ते तोडण्याला परवानगी दिली. ही परवानगी मिळाल्यावर 4 एप्रिल रोजी दुपारी हे झाड लाकूडतोड्याला बोलावून भुईसपाट करण्यात आले, मात्र हे करतानाच वडाच्या झाडालगत असलेले एक चिंचेचे झाड व ईदगाहबाहेर सुधीर वराडे नावाच्या एका माणसाच्या प्लॉटवरील लिंबाचे झाड तोडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. डीबी स्टार चमू घटनास्थळी पोहोचेपर्यंत लाकूडतोड्याने ही दोन्ही झाडे बुंध्यांपर्यंत छाटली.
परवानगी नसताना कत्तल

वडाचे झाड कीडलेले असल्यामुळे ते तोडण्याची परवानगी आम्ही पाहणी करून दिली होती. मात्र, हा महाकाय वृक्ष तोडत असतानाच सभोवतालची अन्य दोन झाडांच्या फांद्या तोडल्यामुळे आम्ही संबंधितांवर कारवाई करणार.
विजय पाटील, वृक्ष अधिकारी, मनपा.


आमची चूक झाली
वडाचे झाड किडले होते, त्यामुळे ते तोडले. या वेळी रचनाकार कॉलनीच्या लोकांनी विनंती केली होती म्हणून लिंबाच्या झाडाचा बुंधा तोडला, तर चिंचेच्या झाडाचा पाला विहिरीत पडत असल्याने त्याच्या काही फांद्या तोडल्या. ही झाडे जमीनदोस्त करण्याचा मानस नव्हताच. आमची चूक झाली, हे कबूल करतो.
शरफूभाई, संचालक , तारा पान सेंटर


हा प्रकारच माहिती नाही
महाराष्ट्रात राज्य वक्फ मंडळाच्या जागेवर जर काही करायचे असेल तर आमचेच पत्र लागते, मात्र याबाबत मी कुठलीही परवानगी मागितली नाही. चौकशी करून कारवाई करतो.
एन. डी. पठाण, सीईओ,वक्फ बोर्ड


शरफूभाईंनीच सांगितले
आम्हाला शरफू भाईंनीच झाड तोडायला सांगितले होते. ती तोडण्याचा ठेका 3 हजारांत दिला.
फिरोज पठाण, इरफान खान-ठेकेदार


नारळाची झाडे तोडली
सिडको एन-5 परिसरात जी सेक्टरमध्ये संतोष कदम यांनी अंगावर नारळ आणि फांद्या पडतात, असे कारण पुढे करत नारळाची तीन झाडे तोडून टाकली. चमू या ठिकाणी पोहोचल्याने एक झाड वाचले.


आम्हीच झाडे तोडली
लहान मुले खेळताना त्यांच्या अंगावर नारळ व फांद्या पडून धोका होऊ शकतो, असे वाटल्यानेच आम्ही ही झाडे तोडली.
संतोष कदम, घरमालक