आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने केलेली रचना मुंबईत ‘ओपन' होईना, वॉर्ड रचनेच्या अहवालात सॉफ्टवेअरचा घोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद मनपाच्या ११३ वॉर्डांच्या रचनेचा औरंगाबादेत तयार केलेला ऑनलाइन अहवाल तांत्रिक घोळामुळे मुंबईत पाहाता येत नसल्याने नवाच घोळ निर्माण झाला आहे. आता त्यात आवश्यक ते तांत्रिक बदल करून अहवाल पुन्हा पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, आयोगही ऑनलाइन वॉर्ड रचनेवरच ठाम असल्याने मनपाने अहवालाची कागदपत्रे पाठवूनही ऑनलाइनचा घोळ सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
औरंगाबाद मनपाचे आता ९९ वरून ११३ वॉर्ड होत आहेत. नवीन वॉर्ड रचना करण्याचे काम पूर्ण झाले असून त्याला आता निवडणूक आयोगाची मान्यता मिळणे आवश्यक आहे. या आधी प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्याने त्या दृष्टीने वॉर्डांची रचना करण्यात आली होती. नंतर मनपा निवडणूक जुन्याच वॉर्ड पद्धतीने होणार असल्याचे जाहीर झाल्याने प्रशासनालाही वॉर्ड रचनेत बदल करण्यात वेळ खर्ची घालावा लागला.

यंदा निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना ऑनलाइन करावी, असे निर्देश दिले आहेत. ही रचनाही ऑनलाइनच सादर करावयाची आहे. आयोगाकडील यंत्रणेला पुढील संगणकाधारित प्रक्रिया करणे सोपे जावे यासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मनपाने आधी कागदावर नकाशे तयार केले होते. नंतर त्याचे संगणकीय नकाशांत रूपांतर करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यावर गेल्या आठवड्यात नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला;
पण तांत्रिक अडचणीमुळे मनपाने सादर केलेला अहवाल मुंबईत ओपनच होत नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यात काही तांत्रिक बदल करून अहवाल पुन्हा पाठवण्यात आला; पण त्याही वेळी हे अहवाल ऑनलाइन ओपन झालाच नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअरमधील फरकामुळे हा प्रकार घडला आहे. तरीही काम अडू नये म्हणून प्रशासनाने अहवालाची हार्ड कॉपीदेखील आयोगाकडे पाठवली; पण आयोगाने ही प्रत ठेवून घेतली असली तरी ऑनलाइन अहवाल आलाच पाहिजे, असे सांगितल्याने आता संबंधित तांत्रिक घोळ निस्तरण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, ११३ वॉर्डांत आरक्षण कसे असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अनुसूचित जातीसाठी २२, जमातीसाठी १, तर ओबीसीसाठी ३१ वॉर्ड असणार आहेत. आयोगाने २००४ २०१०च्या मनपा निवडणुकीत कसे आरक्षण केले होते त्याचे सारे तपशील मागवले असून त्याचा आधार घेत नवीन आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वाढलेल्या १४ वॉर्डापैकी कोणते वॉर्ड आरक्षित असतील ते आताच सांगता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.