आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wastage Plastic Bottle Use In Road Development Experiment Aurangabad

खड्डे बुजवण्यासाठी प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचा प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांचा खड्डे बुजवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, असा प्रयोग एमआयटीतील प्लास्टिक आणि पॉलिमर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील राजलक्ष्मी जोशी आणि ऋचा माडेकर यांनी केला. या बाटल्यांवर रासायनिक प्रक्रिया करून डांबराचे गुणधर्म असलेले द्रव (रेझिन) तयार केले आहे.

या विद्यार्थ्यांनी पेट बॉटल रिसायकलिंग हा प्रयोग हाती घेतला. रोज परिसरात वाया जाणार्‍या हजारो टन प्लास्टिकच्या बाटल्यांचा शहरातील रस्ते बुजवण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, या विचारातून हा प्रयोग केला. या प्रयोगासाठी डॉ. अरुण अष्टपुत्रे आणि विभागप्रमुख सुरंजना मंडलम यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी केरळ आणि परदेशात कॅरीबॅगचा वापर करून प्लास्टिक रोडची संकल्पना यशस्वी करण्यात आली आहे.

असा आहे पेट बॉटल रिसायकलिंग प्रयोग
बाटल्यांच्या तळाचा आणि झाकणाचा भाग कापून उर्वरित भागाचे बारीक तुकडे केले जातात. ते स्वच्छ करून त्यांना इथिलिन ग्लायकॉनसोबत 100 डिग्री तापमानावर उकळून त्यानंतर त्यात थॅलिक आणि मॅलिक अँसिड योग्य प्रमाणात मिसळून पुन्हा 200 डिग्री तापमानावर उकळले जाते. या प्रक्रियेनंतर डांबरासारखे गुणधर्म असलेले रेझिन नावाचे द्रव तयार होते. त्यात रेती, खडी, मार्बल पावडर आणि राख मिसळून तयार केलेले मिर्शण डांबरला घट्ट चिकटून बसते. पाण्याचा यावर कुठलाही परिणाम होत नाही. मिर्शण खड्डय़ात टाकल्यानंतर 24 तासांत दगडासारखे टणक होते.

प्रदूषणाला आळा बसू शकतो
शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, हॉटेल, पर्यटन स्थळे, फास्ट फूड सेंटर आणि इतर भागांतून रोज दोन टनांपेक्षा जास्त रिकाम्या बाटल्या जमा होतात, असे एका भंगार व्यापार्‍याने सांगितले. या बाटल्या वापरल्यानंतर तत्काळ नष्ट कराव्यात अशी सूचना आहे. त्याचे रिसायकलिंग अशा प्रकारे झाल्यास मोठय़ा प्रमाणावर कचर्‍याची विल्हेवाट लागू शकते व प्रदूषणाला आळा बसू शकतो.

डांबराला रेझिन पर्याय ठरेल
प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांवर प्रक्रिया करून विद्यार्थ्यांनी तयार केलेले रेझिन द्रव डांबरला एक सक्षम पर्याय होऊ शकतो. प्रयोग शाळेतील अंतिम चाचणी यशस्वी झाल्यास खड्डे बुजवण्यासाठी एक चांगला पर्याय मिळेल. डॉ. अरुण अष्टपुत्रे , मार्गदर्शक

अशा प्रकारचे द्रव तयार करण्याचे साधन महाविद्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील छोट्या अँपरॅटसमध्ये तयार करून त्याचे छोटे स्लॅब तयार करण्यात आले आहेत. या स्लॅबवर कार आणि जड वाहनांची चाचणी घेतली. सध्या अंतिम चाचणी सुरू असून, ती यशस्वी झाल्यास महाविद्यालयाकडून त्याचे पेटंट घेण्यात येईल, अशी माहिती विभागप्रमुख सुरंजना मंडलम यांनी दिली. तर प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.