आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: दुष्काळमुक्तीसाठी गोळेगावामध्ये कुटुंबनिहाय पाण्याचे बजेट तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतीला लागणारे पाणी असो अथवा शेतकऱ्याची मेहनत, याचा हिशेब शेतकरी कधीच करत नाही. मुळात उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन शेतकऱ्याकडून फारसे होत नाही आणि त्याचे प्रशिक्षणही फारसे मिळत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावमध्ये  आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या पाण्याचा हिशेब लिटरनिहाय केला जाणार आहे.  

पावसाच्या पाण्यातून  शेतात  किती  पाणी उपलब्ध होते, प्रत्येकाला  किती पाणी लागते याचे  गोळेगावात नियोजन करण्यात येत आहे.  यामध्ये आता लिटरच्या पाण्याचा भाव किती आणि शेतात पडणाऱ्या पाण्याची किंमत किती आहे, इतक्या साध्या बाजारभावाच्या गणितानुसार शेतकऱ्यांना पाण्याची किंमत समजावून सांगण्याचा प्रयत्न गोळेगावचे सरपंच संतोष जोशी आणि कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांच्या माध्यमातून केला जात आहे.  

याबाबत कृषी सहायक अशोक पठाडे यांनी सांगितले की, गावातल्या ३५० कुटुंबांची सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे नोंदणी केली आहे. पहिल्या भागात ७५५ मिमी पडणाऱ्या पावसाचे नियोजन, तर दुसऱ्या भागात पीक पद्धती, फळबाग, जनावरे, घरातील मनुष्य  यानुसार पिकासाठी किती पाणी लागते याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ऊसवाल्यांना, मोठ्या शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी वळवण्यात येणार असून पीक पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. 
 
गोळेगावचे सरपंच संतोष जोशी म्हणाले की, पाऊस किती पडतो,  माझ्या शेतीची गरज किती आणि मी वापरतो किती, यासाठी माझे दायित्व काय आहे हे लोकांना सांगण्यात येत आहे.  वेळ गेली असली तरी लोकांना हे समजायला वेळ लागेल. लहान मुलांनाही समजावून सांगावे लागेल. बँकेत पैसे किती यानुसार आपण नियोजन करतो त्याचप्रमाणे पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. सूक्ष्म नियोजन केले तरच पाणी साठवण्यासाठी सुरुवात होईल, असे जोशी यांनी सांगितले.

सहभागासाठी एक वेळ जेवण 
गावाचे सरपंच संतोष जोशी २०१५ पासून सरपंच आहे.  यापूर्वीदेखील पाच वर्षे  सरपंचपद भूषवले आहे. गावाला २००७ मध्ये निर्मलग्राम, २०१६-१७ स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शक असणाऱ्या जोशी यांनी आतापर्यंत २० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती केली आहे. मात्र, ग्रामविकासाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्रात काम करत आहेत. अामिर खानच्या वॉटर कप स्पर्धेतही गावाने सहभाग घेतला आहे. गावातल्या नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी  एक वेळ जेवण सुरू केले, मात्र कृषी विभाग वगळता इतर विभागांचे सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. 

शेततळ्याच्या माध्यमातूनही पाणी साठवण
गावात ७० शेततळ्यांचे नियोजन करण्यात येत असून १२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. पाच एकर शेती असणाऱ्या रामकृष्ण शंख यांनी सांगितले की, त्यांच्या शेतात शेततळे करण्यात येत आहे. २० बाय ३० शेततळ्यासाठी ६० हजार खर्च अपेक्षित असून मागेल त्याला शेततळेमध्ये ४६ हजार मिळणार आहेत. त्यामुळे फायदा होणार असल्याचे शंख यांनी सांगितले.

शिबीरासाठी ७० मुलींना पाठवले शिर्डीला 
ग्रामपंचायतीच्या वतीने गावातल्या पाचवी ते बारावी पर्यतच्या मुलींना गायत्री परिवाराच्या वतीने शिर्डी येथे भरलेल्या संस्कार शिबीरांना पाठवण्यात आले होते.  इथेही मुलींनी दुष्काळावर नाटक सादर केले. गावातल्या मुलींनाही पाण्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. त्याचा परिणाम कुटुंबाना पाण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी फायद्याचे ठरत असल्याचे जोशी यांनी सांगितले
 
पुढील स्लाइडवर पाहा,
> असा आहे गोळेगाव येथे पडणारा पाऊस... 
७० शेततळ्यांचे नियोजन...
> कुटुंब वॉटर बजेट अत्यावश्यक.... 
बातम्या आणखी आहेत...