आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुकानांमध्ये विहिरी, पाण्याचा धंदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात खासगी बोअरमधून बेसुमार पाणी विक्री सुरू आहे. डीबी स्टार चमूने संपूर्ण शहर पिंजून काढले. त्या वेळी धक्कादायक प्रकार उघड झाले. चार ठिकाणी दुकानांमध्येच विहिरी खोदून पाण्याचा धंदा सुरू आहे. उच्चपदस्थ लोकांसह अनेकांनी खासगी बोअरमधून भरमसाट पाणी उपसा केला जातो. जवळपास 75 खासगी विहिरींमधून पाणी विक्री केली जाते. यामुळे परिसरातील बोअर आटत आहेत. मनपाने विहिरी आणि बोअर अधिग्रहित करून पाण्याचा धंदा बंद करणे गरजेचे आहे.

साधारण 1990 च्या सुमारास सिडकोने हडको एन-11 मधील एच सेक्टरमध्ये 10 बाय 10 चे टपरी मार्के ट स्थापन केले. सुशिक्षितांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूनेच हा निर्णय घेण्यात आला; पण या टपरी मार्केटमध्ये गाळा नंबर 125 मध्ये सुभाष कुचे, गाळा नंबर एच 136 मध्ये बाबूराव जाधव, गाळा नंबर एल- 39 मध्ये चांगदेव गायकवाड, तर गाळा नंबर जे- 39 मध्ये रमेश मोहिते या चौघांनी दुकानातच विहीर खोदून बेकायदा पाण्याची विक्री चालू केली आहे. यामुळे आसपासच्या परिसरातील जलसाठा आटू लागला असून ज्या मूळ हेतूसाठी हे गाळे उभारले होते त्या हेतूलाच पद्धतशीरपणे फाटा देण्यात आला.

रोज शेकडो टँकरची विक्री - या चौघांनीही गेल्या 10 वर्षांपासून आपापल्या 10 बाय 10 च्या गाळ्यात 35 ते 50 फूट खोल विहिरी खोदल्या आहेत. त्यावर पद्धतशीरपणे स्लॅब टाकले. त्यावर विद्युत पंप बसवून सार्वजनिक रस्त्यापर्यंत पाइपलाइन केली. त्यातून दिवसभरात पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत. हसरूल, सिडको, हडको, जाधववाडी परिसरात येथून दिवसभरात लाखो लिटर पाण्याची विक्री होते. बेसुमार उपसा होत असल्याने आसपासच्या परिसरातील बोअर मात्र आटत आहेत. काही जागरूक नागरिकांच्या तक्रारीनंतर डीबी स्टारने या पाणी विक्री केंद्राची पाहणी केली. तपासाअंती या चौघांनीही कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले.

खासगी बोअरमधून पाणी विक्री - मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमातानगरात दीपक अंबिलढगे, सातार्‍यातील रेल्वे रुळांना लागून असलेल्या जागेत सांडू पटेल, आरटीओ कार्यालयासमोर नवीद मगरूबी, विर्शांतीनगर परिसरात शेख माजीद; प्रकाशनगर येथील बाळासाहेब पवार, बन्सीलालनगर येथील रवी तिळवणकर आदी लोकांनी आपल्या घरातच बोअर खोदून पाणी विक्री सुरू केली आहे. 5 ते 10 हजार लिटर पाणी वाहण्याची क्षमता असलेल्या शेकडो टँकरची विक्री करतात. यातील काही लोकांचे स्वत:चेही टँकर आहेत. हे पाणी पिण्यासाठीच वापरले जाते की अन्य कामांसाठी याचा विचार कुणीच करत नाही.

पोलिसही मागे नाही - हडको एन-9 एच सेक्टरमध्ये फुलचंद उमरे यांचे घर क्रमांक (17/4) आहे. ते जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक या पदावर आहेत. त्यांनी औरंगाबादेतील आपल्या घरात 120 फूट खोल बोअर घेतला आहे. विद्युत पंपाद्वारे यातून ते रोज किमान 50 ते 60 टँकर पाणी विकतात. बेसुमार उपसा होत असल्याने त्यांच्या आसपासच्या बोअरमधील पाणी पातळी खोल खोल जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केली. चमूने प्रत्यक्ष पाहणी केली असता पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरची पाणी भरण्यासाठी रांग दिसली. या वाहनांमुळे गल्लीतील रस्ता अडत असल्याने अपघाताची समस्याही निर्माण झाली आहे.

75 खासगी विहीरींचाही समावेश - वरील उदाहरणे ही प्रातिनिधीक आहेत. याशिवाय शहरातील 75 खाजगी विहिरींमधूनही पाण्याचा भरमसाठ उपसा चालू आहे. शहरात अशी विक्री सर्रास सुरू आहे.कडक कायदा नाही आणि आहे त्या नियमांप्रमाणे कारवाई होत नाही, त्यामुळे हे संकट गडद होत आहे.

..तर असे बोअर अधिग्रहित करू - ग्रामीण भागातील भूजल सर्वेक्षण कायद्याची प्रत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत मागवली जाईल. त्यानुसार येथेही काही नियम व अटी लादल्या जातील. बोअरवेल घेण्याची परवानगी, खोलीचे अंतर याबाबत निर्बंध घातले जातील. बेसुमार उपसा करणारे बोअर अधिग्रहित करणार. मालमत्तेवर हक्क समजू शकतो, मात्र पाणी हे सार्वजनिक आहे. यावर सर्वाचा हक्क आहे. यासाठी मी लक्ष देणार.सर्वसाधारण सभेत पॉलिसी धोरणात हा प्रस्ताव मी स्वत: दाखल करणार. - सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता, मनपा

लोकांमध्ये जागृती असावी - यासाठी कायदाच असला पाहिजे, अन्यथा भूजल पातळी आणखी खोल जाईल. परिणामी टंचाई आणखी वाढेल. आजारावर औषध शोधण्यापेक्षा आजार होणारच नाही, यासाठी उपाययोजना करावी लागेल. ग्रामीण भागातील कायद्यानुसार कारवाई करणार.- कला ओझा, महापौर.

लोकांचे हक्काचे पाणी गेले - शहरातील पाणी पातळी 18 फुट खोल गेल्याने लोकांना बोअरचे हक्काचे पाणी मिळत नाही. शहराच्या आसपास पाण्याचे स्त्रोत आटले. निदान भुजलसाठयातील पाण्यावर सर्वाना समान मिळावे यासाठी कुणीतरी प्रय} करणे गरजेचे आहे.भुजल अधिनियम 1993 लागू करावा.यासाठी लोकप्रतिनिधी,अधिकारी यांनी मनावर घेतले पाहिजे. - संजय केनेकर गटनेता.

प्रस्ताव मांडणार - शहरातील काही खाजगी बोअरधारकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय चालू केल्याने घरगुती बोअरवेलच्या उपशांवर परिणाम होत आहे.मात्र महानगरपालिका मुंबई प्रांतिक कायद्यातही क ायदा नसल्याने आमचे पर्याय खुंटले आहेत, मात्र भूजल अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतीच्या आधारावर असा कायदा पालिकेतही लागू करावा यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून प्रस्ताव मांडणार. - विकास जैन, स्थायी समिती सभापती, मनपा.