आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी मृतसाठ्यावर, १० टक्के पाणी कपातीची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - दीर्घ विश्रांतीनंतरही वरुणराजाला पाझर फुटत नसल्याने जायकवाडीचा साठा झपाट्याने खालावत आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता धरणाने मृतसाठा गाठला. जायकवाडीतील उपशाचा वेग असाच कायम राहिल्यास आठवडाभरात पिण्याच्या पाण्यात १० टक्के कपातीची शक्यता पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली. यामुळे भरपावसाळ्यातच टंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषिपंपांचे भारनियमन वाढवल्यामुळे दररोज ०.५० दलघमी पाणी बचत होत आहे.
धरणाच्या बॅक वॉटरसह धरण क्षेत्रातून आठ हजारांपेक्षाही जास्त कृषिपंपांनी शेतीला पाणी उपसा सुरू आहे. दररोज सुमारे १ दलघमी पाणी कृषिपंपांनी उपसा होत होते. भारनियमन वाढवल्यामुळे आता या उपशावर मर्यादा आली आहे. बचत होणाऱ्या या पाण्यातून तीन दिवस सहज तहान भागवली जाऊ शकते. औरंगाबाद, जालन्यासह सुमारे ३५० पाणी योजनेला जायकवाडीतून पाणीपुरवठा होतो.

पाणीपुरवठ्यात अडचणी
पैठण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी जेसीबीने खोदकाम करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी दिली. दरम्यान, धरण मृतसाठ्यावर आल्याने गोर्डे यांनी धरणावर जाऊन पाणीपातळीची माहिती घेतली.

बैठकीत निर्णय
जायकवाडी धरण मृतसाठ्यावर पोहोचल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी औरंगाबादेत येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पिण्याच्या पाण्यात १० टक्के कपातीचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.

दीड महिन्यात
५ टक्के साठा साफ

{मृतसाठ्यात ७३८ दलघमी पाणी आहे. मात्र, यात सुमारे ६० टक्के गाळ असल्याचा जलतज्ज्ञांचा अंदाज आहे.

{५ टक्के साठा २५ मे २०१५ रोजी होता. म्हणजेच दीड महिन्यात जायकवाडीतून ५ टक्के पाणीसाठा कमी झाला. पिण्याचे पाणी, उद्योग, शेती, अवैध उपशासह बाष्पीभवनाने ५ टक्के साठा संपला. हे पाणी वर्षभर पुरेल असा दावा प्रशासन करत असले तरी अवघ्या दीड ते पावणेदोन महिन्यांतच ५ टक्के पाणीसाठा संपल्याने मृतसाठा किती दिवस पुरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...