आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळीपूर्वी ‘समांतर’चा शुभारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सार्वनिक बांधकाम विभागाने जलवाहिनी टाकण्यासाठी जागा देण्याचे मान्य केल्यानंतर आता दोनच महिन्यांत बहुचर्चित समांतर प्रकल्पाचे काम सुरू होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे दिवाळीचे फटाके फुटण्यापूर्वीच समांतरचा ‘धमाका’ होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला आहे. काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पाणीपुरवठय़ास तीन वर्षे लागू शकतात. म्हणजेच 2015 च्या दिवाळीचे अभ्यंगस्नान या प्रकल्पाच्या पाण्याने होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

बांधकाम विभागासोबत करार करणे, ठेकेदाराने कर्ज उभारणे आणि पालिकेने 94 कोटी 50 लक्ष रुपये बँकेत जमा करणे एवढय़ाच बाबी आता शिल्लक राहिल्या आहेत. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अन्य बाबी स्पष्ट झालेल्या असल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या विशाल प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. थोडासा विलंब झाला तरी दिवाळीपूर्वी काम सुरू होणार हे नक्की असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठेकेदार कर्जासाठी बँकेत - औरंगाबाद वॉटर युटिलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रकल्प उभारणीचे काम करणार असून कर्जासाठी त्यांनी आयडीबीआयसह अन्य काही बँकांकडे धाव घेतली आहे. प्रकल्पाची जागाच पालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे आतापर्यंत त्यांना अडथळे येत होते. आता हे संकटही दूर झाले आहे. पहिल्या टप्प्यात ते नेमके किती कर्ज घेणार हे अजून स्पष्ट नाही. कर्ज उपलब्ध होण्यासाठी 45 ते 60 दिवस लागतील, असे पालिका सूत्रांनी सांगितले.

पालिकाही उभारणार 94 कोटी - ठेकेदाराला द्यावयाच्या वार्षिक हप्त्याच्या (62 कोटी) दीडपट (94 कोटी 50 लक्ष) एवढी रक्कम बँकेत डिपॉझिट ठेवणे पालिकेवर बंधनकारक आहे. त्यासाठी पालिकेला आयडीबीआय या बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे. विजेच्या थकबाकीतून मुक्ती मिळवण्यासाठी पालिकेने एकूण 200 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यातील 97 कोटी रुपये पूर्वीच घेतले आहे. दोनशे कोटींच्या दीडपट म्हणजेच 300 कोटी रुपयांची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्यानंतर 94 कोटी 95 लाख रुपये पालिकेला मिळणार आहेत. त्यासाठी भूखंडांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून बँकेकडे ते सुपूर्द केल्यानंतर ही रक्कम मिळेल. त्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. ऑक्टोबरपूर्वी पालिका आणि ठेकेदाराकडून सर्व कामे पूर्ण होणार असून त्यादरम्यानच प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाईल.
कालबद्ध आराखडा करणार - या प्रकल्पातील महत्त्वाचा अडसर दूर झाला आहे. जायकवाडी येथील उपसा विहिरीचे काम जुलैपासूनच सुरू झाले आहे. अन्य काम ऑक्टोबरपासून वेगाने सुरू होईल. त्यासाठी आम्ही कालबद्ध आराखडा तयार करीत आहोत. डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त.