आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळगंगेत सापडले पाण्याचे झरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येथील ऐतिहासिक नदी म्हणून येळगंगा नदी नावारूपास आली आहे. या नदीचे विकासकाम मागील काही दिवसांपासून "दैनिक दिव्य मराठी अभियान' व ग्रामस्थ, पदाधिका-यांच्या सहकार्यातून सुरू आहे. आतापर्यंत नदीचा विकास करण्यासाठी अनेकांनी आर्थिक व श्रमदान तसेच अन्य स्वरूपात मिळेल तसा हातभार लावला आहे. त्यामुळेच आज ख-या अर्थाने येळगंगा नदीचा कायापालट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

या नदीचे खोदकाम करत असताना पूर्वी दोन पाण्याचे जिवंत झरे सापडले होते. शुक्रवारीही तसाच पाण्याचा झरा सापडल्याने आता या परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान दिसून येत आहे.

येळगंगा नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी, महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक आनंद असोलकर, निश्चल शेंडे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुरू आहे. आतापर्यंत नदीपात्राचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या शांतीगिरीजी महाराज यांच्या स्वखर्चातून अर्धा किमी नदीपात्राचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काम सुरू असताना जिवंत पाण्याचा झरा आढळून आला. यापूर्वीही दोन जिवंत पाण्याचे झरे सापडले आहेत. त्यामुळे आता तीन जिवंत पाण्याचे झरे सापडल्याने या भागातील मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या ख-या अर्थाने सुटणार आहे.

सीता न्हाणी धबधब्याचे
आता खुलणार सौंदर्य
येळगंगा नदीपात्राचा विकास करत असताना पुरातत्त्व विभागानेही पुढाकार घेत सीतेच्या न्हाणीच्या धबधब्याजवळ असलेल्या दोन केटी वेअरमधून गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच परिसरही स्वच्छ करण्यात येत असल्याने हा धबधबा येत्या पावसाळ्यात आणखी खुलून दिसणार अाहे. त्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर तर पडणारच, पण पर्यटकांनाही मनसोक्त धबधबा पाहत त्यांचा आनंद लुटता येईल.

जे पेराल तेच उगवेल : शांतीगिरी महाराज
जे पेराल ते उगवेल हा सृष्टीचा नियम आहे. सध्या येळगंगा विकास पथक व दैनिक दिव्य मराठी पाणी पेरायचे काम करत आहे. या अभियानामुळे येळगंगा नदीपात्र परिसरात कधीही दुष्काळ दिसणार नाही. नदीपात्रात अातापर्यंत सापडलेल्या पाण्याच्या झ-यामुळे पक्षी, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, असेही शांतीगिरी महाराज म्हणाले.

प्रशासनाचे केटी बंधारे गुलदस्त्यातच
येळगंगा नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी केटी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती. प्रशासनाने दखल घेत तत्काळ दोन केटी बंधारे मंजूर केले, परंतु अद्यापही त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे मंजूर केटी बंधा-यास केव्हा सुरुवात होईल, असा प्रश्न ग्रामस्थ एकमेकांना विचारताना दिसत आहेत.
पोलिसांनीही उभारला बंधारा खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचा-यांनी श्रमदानातून येळगंगा नदीपात्रास जोडणा-या नागझरी नाल्यावर वनराई बंधारा उभारला आहे. या नदीपात्र परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत यंदा नक्कीच वाढ होईल, अशी अाशाही पोलिसांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...