आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Filling In Tankar Come Into CCTV Camera Watch

पाण्‍याचे टँकर भरताना सीसीटीव्ही करेल आता निगराणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उन्हाळ्याच्या झळा अजून तेवढय़ा तीव्र झालेल्या नसतानाही औरंगाबाद जिल्ह्यात टँकर्सवर 30 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. एप्रिलपासून टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होणार असल्याने टँकरद्वारे होणार्‍या पाणीपुरवठय़ावरील खर्चाचा आकडा 1 अब्जापुढे जाऊ शकतो, असा प्रशासनाचा कयास आहे. आम्ही 52 कोटी रुपयांचा नियोजन आराखडा तयार केला होता. त्यात कितीही वाढ झाली तर पैसे कमी पडणार नाहीत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी म्हटले आहे. टॅँकर भरण्याच्या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी आता पालिका तसेच एमआयडीसीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

असा आहे टँकरवर ‘वॉच’

भरलेले टँकर्स त्याच गावाला जाते की मध्येच त्यावर डल्ला मारला जातो यासाठी प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आहे. टँकर्स भरून निघाले की गावातील ग्रामसेवकांना मोबाइलवरून मेसेज जातात. टँकरचा क्रमांकही त्यावर नमूद केलेला असतो. अमुक क्रमांकाचा टँकर अमुक गावात पाणी टाकणार हे ठरलेले आहे. वेळेत टँकर पोहोचला नाही तर लगेच चालकाकडे विचारणा होते. गावात तेवढे टँकर पोहोचले की नाही, याची खातरजमा केली जाते. यासाठी सरपंच तसेच सदस्यांचीही मदत घेतली जाते. गावात किती टँकर्स आल्याची नोंद प्रशासनाकडे झाली, याची माहिती गावकर्‍यांना दिली जाते.


जिल्ह्यातील सध्याचे चित्र
1400 गावांपैकी 255 गावे आणि 6 वाड्यांना 305 टँकर्सने दररोज पाणीपुरवठा होतो.
पाणी उपलब्ध व्हावे यासाठी 629 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी, मनपाकडून काही ठिकाणी टँकर्स भरून घेतले जातात.
टँकर्सची ही संख्या मे महिन्याच्या शेवटपर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे.


असे आहेत टँकर्सचे दर
1500 रुपये ठरलेले दैनिक शुल्क. त्यानंतर प्रतिकिलोमीटरच्या प्रवासासाठी 18 रुपये.
अधिग्रहित विहिरींसाठी - प्रत्येकी 400 रुपये रोज.
एमआयडीसी किंवा पालिकेकडून एक टँकर भरून घेण्यासाठी 75 रुपये (हे दर अजून निश्चित नाहीत.) एमआयडीसीने तशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला टंचाई निवारणासाठी 52 कोटी रुपये लागतील, असा नियोजन आराखडा ऑक्टोबरमध्येच तयार करण्यात आला होता. खर्च वाढला तरी पैशांची कमतरता भासणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून निधी वळवता येऊ शकतो. टँकर्सची संख्या कितीही वाढली तर नागरिकांना पाणी दिले जाईल. टँकरमधून निघालेले पाणी योग्य त्याच ठिकाणी जाईल, यासाठी आमची यंत्रणा दक्ष आहे.’’ विक्रमकुमार, जिल्हाधिकारी