पैठण- गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील पीक परिस्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात सध्या ५० टक्के साठा असल्याने प्रथमच जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरिपासाठी प्रत्येकी ९०० व १९०० क्युसेक वेगाने पाणी सोडले असल्याने लगतची पिके काही प्रमाणात तरली असली तरी अद्यापही परिसरात पावसाची प्रतीक्षा आहे. एकूणच दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यात जूनच्या पहिल्या पावसानंतर एकही दमदार पाऊस झाला नाही. जूनच्या पावसावर व हवामान विभागाच्या अंदाजाने मरावाड्यात कपाशी, बाजरीसह खरिपाची ७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. आज हे पीक पूर्णत्व वाया जाण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला असून तसा अहवाल सरकारला पाठवला आहे. पाण्यावर दोन्ही कालव्याखाली येणारी एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पिके तरली असल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या महिनाभरापासून परभणी व अहमदनगर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याने दोन्ही कालव्यावरील खरिपामधील बाजरी, कपाशीची पूर्ण पिके वाचली आहेत.
मराठवाड्यात दुसऱ्यांदा हे चित्र
मागील वर्षी चांगला पाऊस झाला. त्यात धरणाचा साठा वाढल्याने सात पाणी पाळी शेतीला देण्यात आल्या होत्या. आता ही शेतीला पाणी दिले जात असल्याने मराठवाड्यात आज सलग दुसऱ्या वर्षी शेतीला पाणी मिळाले.
जायकवाडीचा साठा ५१ टक्क्यांवर आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १९०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यावर परभणीपर्यंत शेती ओलिताखाली येईल.
- अशोक चव्हाण, अभियंता
ग्रामसेवकाकडे कामाची मागणी नागरिकांनी करावी. त्यावर रोजगार देण्यात येईल. मात्र, रोजगाराअभावी स्थलांतर झाले असल्याची आमच्यापर्यंत तरी काही नोंद आली नाही.
- भास्कर कुलकर्णी, बीडीओ