आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचे पाणी नगरकडे वळवले, दोन कालव्यांतून श्रीरामपूरकडे विसर्ग सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याऐवजी ओझर वेअरच्या दोन्ही कालव्यांचे पाणी अहमदनगरकडे वळवण्यात येत असल्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत आहे. दीड महिन्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 89.90 दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. असे असले तरी धरणातील पाणीसाठा शून्य टक्यांपेक्षा कमी आहे. मृतसाठ्याची पातळी ओलांडण्यासाठी आणखी 74 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग केला जात असताना जायकवाडीमध्ये मात्र साठ्यात फारशी वाढ झालेली नाही. धरणामध्ये 664.559 दलघमी पाणीसाठा आहे. मृतसाठा भरण्यासाठी 738 दलघमी पाणीसाठा आवश्यक आहे. नांदूर-मधमेश्वर धरणातून 6300 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत कालपासून 22.95 दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
ओझरच्या दोन्ही कालव्यांतून विसर्ग...
ओझर वेअर येथील प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. अनुक्रमे 877 क्युसेक्स आाणि 269 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. हे पाणी नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरसाठी वळवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीही नांदूर-मधमेश्वरच्या कालव्यातील पाणी वळवण्यात आले होते.
मोठ्या प्रकल्पांची स्थिती
आतापर्यंत मराठवाड्यातल्या 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 14 टक्के पाणीसाठा वाढला आहे. या प्रकल्पामध्ये 726 दलघमी उपयुक्त साठा आहे. मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 19 टक्के तर 717 लघु प्रकल्पांत 17 टक्के साठा झाला आहे. यामध्ये 250 दलघमी साठा झाला आहे. तसेच गोदावरी नदीवरील 11 बंधार्‍यांमध्ये 30 टक्के पाणी आहे. या बंधार्‍यात 69.77 दलघमी पाणी आहे.

मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात नेहमीच नगरच्या पुढार्‍यांकडून अन्याय केला जातो. सत्ताधार्‍यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकिटे मागत फिरणार्‍यांकडून जायकवाडीचे हक्काचे पाणी पळवले जात आहे.
चंद्रकांत खैरे, खासदार

जायकवाडी आणि मराठवाड्यातील धरणे मृतसाठ्यामध्येच आहेत. अशा वेळी खरिपाच्या नावाखाली पाणी सोडणे चुकीचे आहे. खोरेनिहाय नियोजनामध्ये खालच्या भागातल्या धरणांमध्ये काही प्रमाणात तरी पाणीसाठा होणे गरजेचे आहे. मात्र हा पाणीसाठा झालेला नसतानाही पाणी सोडणे चुकीचे आहे.
प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

नगरला पाणी वळवल्यामुळे त्याचा परिणाम जायकवाडीच्या साठ्यावर होतो आहे. जायकवाडीचे पाणी वळवले जाऊ नये यासाठी अधिकार्‍यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये दखल घेतली पाहिजे.
अ‍ॅड प्रदीप देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ