आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नांमका’तून वैजापूर, गंगापूर तालुक्यासाठी पाणी सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर/गंगापूर- वैजापूर,गंगापूरसह कोपरगाव या तीन तालुक्यांत पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी  नाशिक पाटबंधारे विभागाने नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात गुरुवारी २१ दिवसांचे संरक्षणात्मक पाणी आवर्तन सोडले आहे. दरम्यान नाशिक पाटबंधारे विभागाने प्रथमच संरक्षणात्मक पाणी आवर्तन नांमका कालव्यात सोडण्याचे औदार्य दाखविले असून या आवर्तनाच्या पाण्याचे मोजमाप, येणाऱ्या हंगामातील पाणी वाटप नियोजनात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती नांमका प्रशासनातील सूत्रांनी दिली.

नाशिक  जिल्ह्यात दमदार पावसामुळे विविध सिंचन प्रकल्पात समाधानकारक जलसाठा होण्याबरोबरच गोदावरी नदीचे पात्र पाण्याने दुथडी भरून वाहत असल्याने  वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी  नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याच्या मागणीचा रेटा आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तर शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी थेट संपर्क साधून केला होता. 

त्यामुळे जलसंपदा विभागाने नांमकात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याऐवजी संरक्षणात्मक पाणी आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली. निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पीकअप वेअरमधून सकाळी सात वाजता कालव्यात पाणी  सोडले.
 
पाण्याची कपात होणार  
नाशिक पाटबंधारे विभागाकडे येथील आजी-माजी लोकप्रतिनिधीने कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याऐवजी संरक्षणात्मक पाणी आवर्तन खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी दीड टीएमसी  पाणीसाठा सोडला. सदरील पाणी आवर्तनात वापर केलेल्या दीड टीएमसी पाण्याची कपात येत्या हंगामातील पाणीवाटप नियोजनात समाविष्ट केली जाणार आहे.

ओव्हरफ्लोचे या वर्षात मिळाले पाणी  
नांदूर मधमेश्वर जलद कालव्यासाठी निर्मिती केलेल्या मुकणे ,वाकी ,भावली या धरणातून २०११-१२,२०१५-१६,२०१६ यावर्षात सदरील प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती नांमका प्रशासनाने दिली.

कसे सोडले जाते पाणी 
नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात नाशिक पाटबंधारे विभागाने संरक्षणात्मक पाणी आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली. नाशिक जिल्ह्यातील मुकणे (२७ %), वाकी (२१ %), भावली (९० %) या धरणात समाधानकारक पाणी नसल्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात सोडता येणार नसल्यामुळे इतर प्रकल्पांतील पाण्यातून वैजापूर, गंगापूर ,कोपरगावला संरक्षणात्मक पाणी आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून तिन्ही तालुक्यांतील १८ हजार हेक्टरमधील खरीप पिकांना संजीवनी देण्याचे नियोजन आहे.
बातम्या आणखी आहेत...