आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water From Upper Dams Start To Came In Jayakwadi

प्रतीक्षा संपली : हक्काचे बहुप्रतीक्षित पाणी अखेर धीम्या गतीने आले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी एक दिवस उशिराने जायकवाडीत दाखल होण्यास सुरुवात झाली; पण वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी केली. त्यामुळे जायकवाडीत धिम्या गतीने पाणी पोहोचत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी दिली.

जायकवाडीसाठी रविवार रात्री पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी सोमवारी जायकवाडीत दाखल होण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला होता. मात्र, एक दिवस उशिराने मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता जायकवाडीत पाणी दाखल झाले. यात मुळातून सध्या ३ हजार १७१ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. हाच मुळाचा वेग सोमवारी ६ हजारांच्या वर होता. तो आता ३ हजारवर केला आहे. शिवाय सोमवारी कडवातून ३ हजार क्युसेकने जायकवाडी पाणी सोडले जात होते. मंगळवारी ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर ५४३ क्युसेक, दारणा ५ हजार, नांदूर मधमेश्वर ५ हजार ५७६ क्युसेक व ओझर बंधाऱ्यातून जायकवाडीत १ हजार ८०९ क्युसेकने पाणी येत आहे. पण नदीपात्रात असलेल्या खड्ड्यामुळे पाण्याची गती संथ झाली आहे. त्यामुळे यात येणाऱ्या पाण्याचा वेग कमी आहे.

कायगावात झाले पाण्याचे पूजन
गंगापूर | नगर जिल्ह्यातील निळवंडे व मुळा धरणातून रविवारी रात्री सोडण्यात आलेले पाणी कायगाव टोका येथील गोदावरी प्रवरा संगमाच्या जायकवाडी बॅकवॉटरमध्ये ७ वाजेच्या सुमारास दाखल झाले. निळवंडे व मुळा धरणातून सात हजारपेक्षा अधिक वेगाने सोडण्यात आलेले हे पाणी नदीपात्रामधून झिरपत- झिरपत येत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे.नेवासा तालुक्यातील पाण्याचे मापन यंत्र असलेल्या मधमेश्वर बंधारा या ठिकाणी या पाण्याची गती सायंकाळी ५ वाजता ३११३ क्युसेक इतकी मोजण्यात आल्याचे जायकवाडीकडून सांगण्यात आले.

नेवासा, श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंद
तीन वर्षांपासून पावसाअभावी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदी पूर्णपणे कोरडीठाक आहे. निळवंडे व मुळा धरणातून मराठवाड्याच्या नावाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा काठावरील शेकडो गावांना पिण्याचे व सिंचनासाठी या पाण्याची मोठी मदत होईल, अशी भावना नेवासा तालुक्यातील स्वागत चव्हाण या शेतकऱ्याने बोलून दाखवली.

पूजनासाठी नेते मंडळींचे गुडघ्याला बाशिंग
जायकवाडीत आमच्यामुळेच पाणी आले. आम्हीच पूजन करू, अशी भूमिका काही पुढारी नेत्यांनी दोन दिवसांपासून घेतली आहे, तर काहींनी आजच पाण्याचे पूजन करण्याची तयारी केली होती. मात्र, आज पाणीच दाखल झाले नाही. त्यामुळे एका पुढाऱ्याचा भ्रमनिरास झाल्याचे दिसले. आता या पुढाऱ्याने बुधवारी सकाळीच पूजनासाठी जाण्याची तयारी केली आहे. यातून पाण्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींनी सुरू केला आहे. मात्र, ते किती येते याकडे दुर्लक्ष.