आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पाण्याच्या गळतीचा हिशेबच नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणातून दररोज 110 द.ल.घ.मी. पाणी शहरात येते आता धरणात फक्त 2 टक्के पाणीसाठा उरला आहे. असे असताना थेंब-थेंब पाणी वाचवले पाहिजे. मनपा शहरवासीयांना पाणी जपून वापरण्याचे सल्ले देते; पण प्रत्यक्षात मनपाकडूनच मोठय़ा प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची दररोज मोठी नासडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. डीबी स्टार चमूने सतत चार दिवस या गंभीर प्रकरणी पाहणी व तपास केला.

पालिकेचे टँकर गळके, कंत्राटदार ठेवतो झाकण उघडे, 25 टक्के पाणी नासाडी

'दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्यासाठी दाहीदिशा होत असताना लोकांना पाणी मिळावे यासाठी मनपा टँकरचा वापर करते. मनपाच्या मालकीच्या 11 आणि कंत्राटदाराच्या 42 टँकरमधून रोज साडेतीन लाख लिटर पाणी शहराला पुरवले जाते, मात्र यातून साधारण 25 टक्के गळती होत आहे. गळके टँकर, झाकण उघडे ठेवणे आणि पाणी भरताना निष्काळजीपणा ही त्याची कारणे असल्याचे डीबी स्टारच्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे मनपात पाण्याचे ऑडिट होत नाही. त्यामुळे नुकसान किती याचा कुठलाही ताळमेळ नाही.'

53 टँकरमधून पुरवठा
महापालिकेचे 11 टँकर आहेत, तर खासगी कंत्राटदाराचे 42 टँकर आहेत. म्हणजेच एकूण 53 टँकरमधून शहरात पाणीपुरवठा होतो. यात छोटे 35, तर मोठे 18 टँकर आहेत. या टँकरच्या रोज 325 ते 350 फेर्‍या होतात. मात्र, निश्चित प्रमाण पालिकेकडे नाही. सिडको एन-5, कोटला कॉलनी, पुंडलिकनगर आदी भागातील टाक्यांतून हा पुरवठा होतो. मोठय़ा टँकरची क्षमता 10 हजार लिटर, तर लहान टँकरची क्षमता 5 हजार लिटरची आहे.

अशी होते गळती
पालिकेचे 11 टँकर आहेत. त्यांची अवस्था कंडम झाली आहे, तर कंत्राटदारही काळजी घेत नसल्याने मोठय़ा प्रमाणावर पाणी गळती होते. त्याची प्रमुख तीन कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

1. टाक्यांमधून पाणी भरताना निष्काळजीपणा.
2. गळके टँकर.
3. टँकरची उघडी झाकणे.

अधिकार्‍यांचे बेजबाबदार उत्तर
मनपाकडे 11 टँकर आहेत, तर खासगी कंत्राटदाराचे 42 टँकर, असे एकूण 53 टँकर असून बहुतांश गळके आहेत. ज्या मोठय़ा टाक्यांतून हे पाणी टँकरमध्ये भरले जाते, त्या ठिकाणी पाण्याचे पाट सतत वाहत असतात. व्हॉल्व्हमधून टाकी भरताना चूक झाल्यानेही पाणी वाया जाते. या वाया जाणार्‍या पाण्याचा हिशेबच मनपाकडे नाही. ही गळती गृहीतच धरावी लागते, असे चमत्कारिक उत्तर मनपाचे अधिकारी देतात.

या गळतीचा हिशेब नाही
वीज गळतीचा जसा हिशेब महावितरणकडे सापडतो तसा पाणी गळतीचा हिशेब मात्र मनपाकडे नाही. 5 वर्षांपूर्वी पाण्याचे ऑडिट झाले होते. त्यानंतर मात्र कधीही असे ऑडिट झालेले नाही. या ऑडिटमधूनच शहरात पाण्याची गळतीचे प्रमाण तब्बल 58 टक्के असल्याचे उघड झाले.