आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोश: रस्ता कमी करा, पण पाणी द्या !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे मनपाची प्राथमिक जबाबदारी असताना बहुतांश भागात निर्जळी आहे. मात्र, टँकरने पाणी मिळावे म्हणून नागरिकांनी पैसे भरले तरीही पाणी दिले जात नाही. हा मुद्दा नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत रेटून धरला. पालिकेने विकासकामातून एखादा रस्ता कमी करावा, पण पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवक नारायण कुचे यांनी केली.

सभापती विकास जैन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (17 जानेवारी) बैठक झाली. शहरवासीयांना भेडसावणार्‍या पाणी प्रश्नावर सदस्य आक्रमक झाले होते. स्थायी समितीचे सदस्य आणि नगरसेवक बालाजी मुंडे, नारायण कुचे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी मागील तीन बैठकीत करूनही त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहरात भीषण पाणीटंचाई आहे. 2 हजार 600 नागरिकांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे आगाऊ पैसे भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे कुचे आणि मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले. ‘प्रशासनाकडे 39 टँकर उपलब्ध आहेत. टँकरने पाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदारांची देयके जर प्रलंबित असतील तर ते पाणी कसे देतील.?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला. सभापती काही क्षण निरुत्तर झाले, कुचे यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत ‘नागरिकांना पाणी हवे आहे, त्यांना तुमच्या तांत्रिक अडचणींशी काही देणे घेणे नाही.’ ‘पैसे भरलेल्या नागरिकांना पाणी केव्हा देणार?’ याचा खुलासा बैठकीत करण्याची त्यांनी मागणी केली. पानझडे यांनी मात्र टँकरसाठी नागरिकांचे पैसे जमा होण्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची सूचना केली. स्वतंत्र खात्यातून कंत्राटदारांची देयके दिली जातील. तथापि, नागरिकांची रक्कमही त्याच खात्यात जमा झाली तर प्रश्न निर्माण होणार नाही असा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मुख्य लेखाधिकारी अशोक शिरसाट यांनी त्वरित असहमती दर्शवत स्वतंत्र खाते उघडता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मनपाच्या मूळ खात्यातच नागरिकांचे पैसे जमा झाले पाहिजे, असे त्यांनी सभापतींना सांगितले.

अधिकार्‍यांत मतभेद

पाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदाराचा 25 लाखांचा धनादेश ‘बाउन्स’ झाला. त्यामुळे कंत्राटदार अतिरिक्त पुरवठा करणार नाहीत, असे पानझडे म्हणाले. लेखाधिकारी थोरात यांनी त्यांचा मुद्दा खोडून आजच (गुरुवारी) 25 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याशिवाय यापुढे प्रत्येक महिन्याला 25 लाख रुपयांचे देयके देण्यात येतील, कुणाचेही जाणीवपूर्वक पैसे अडवून धरले नसल्याचे सांगितले.