आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाने दिली शिकवण; विहिरीसाठी काढले रिकामपण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. नदीनाले कोरडेठाक पडले आहेत. विहिरीतील पाण्यानेही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करू पाहत आहे. पाण्याअभावी वस्त्या, तांडे ओस पडू लागले आहेत. गुरांनाही पाणी नाही. पाणी नसल्यामुळे शेती उत्पादन कमालीचे घटले आहे. अशी परिस्थिती असताना बहिरगाव येथील पांडुरंग दाबके यांनी पाण्याच्या नियोजनासाठी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी घरातील मंडळींची मदत घेतली.

सुरुवातील दाबके यांनी 12 परस विहीर खोदण्याचा अंदाजे खर्च काढला तर तो अडीच लाख रुपये एवढा निघाला. एवढे पैसे खर्च करून विहीर खोदणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी घरच्या घरी विनाविद्युत, विनायंत्र, क्रेनशिवाय कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर न करता विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. पाबळ बहिरगाव शिवारातील शेतीत जुन्या पद्धतीने विहिरीचे काम सुरू केले. याकामी स्वत:सह कुटुंबीय व आसपासच्या बेरोजगारांना समाविष्ट करून घेतले. बेरोजगारांनाही दुष्काळाच्या काळात काम मिळल्याचे समाधान मिळाले. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाबळ बहिरगाव शिवारातील पांडुरंग दाबके यांच्या शेतात जाऊन विहिरीच्या कामावर भेट दिली असता महिनाभरात 35 हजार रुपये खर्च करून 8 परस विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. असे खोदकाम करणारे अर्जुन दाबके, प्रकाश दाबके, ज्ञानेश्वर दाबके, एकनाथ जाधव, राजेंद्र बनकर यांनी सांगितले. या वेळी विनोद पवार, अमोल जाधव उपस्थित होते.

>दुष्काळाचे चटके सर्वांनाच बसत आहेत. या दुष्काळी परिस्थितीत कोणतेच काम नाही. बेरोजगारही हवालदिल झालेले होते. गुराढोरांनाही कुठलेच काम नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेत विहिरीचे काम हाती घेतले. 12 परस विहिरीसाठी ठेकेदाराने अडीच लाख रुपये खर्च सांगितला. तो शक्य नसल्याने घरच्या घरी कुटुंबीयाच्या व बेरोजगार तरुणांच्या हिमतीवर विहीर खोदण्याचे सुरू केले. एक महिन्यात 8 परस विहीर खोदली. त्यासाठी 35 हजार रुपये लागले असून पुढील काम 10 ते 12 हजार रुपयांपर्यत होईल. त्यामुळे पाणी लागण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या नावे ओरड करण्यापेक्षा भविष्याच्या दृष्टीने विहीर अत्यावश्यक होती.
- पांडुरंग दाबके, शेतकरी