आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीचोरी रोखण्यासाठी औरंगाबाद महापालिकेची धडक मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकीकडे औरंगाबाद शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना अनेक ठिकाणी पाण्याची चोरी सुरू आहे. जलवाहिनी गळती रोखण्यासाठी कागदोपत्री मोहिमा राबवल्या जात आहेत. पाण्याची उधळपट्टीही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही बाब नवे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याही निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी मंगळवारी (12 फेब्रुवारी) उपाययोजना केली. पाणी चोरी, गैरवापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तीन विशेष पथके स्थापन करण्याचे जाहीर केले. या पथकातील सदस्य शहराच्या कानाकोपर्‍यात फिरतील. लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन दंड आकारणी करतील, असेही त्यांनी सांगितले.

शहराला दररोज किमान 175 एमएलडी (दशलक्ष घनलिटर) पाण्याची गरज आहे. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने जेमतेम 120 एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे. त्यातही गळती, कंपन्यांचा पुरवठा यामुळे 90 एमएलडी शहरात येते. यापुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत, तरीही शहरातील अनेक जण पिण्याच्या पाण्याचा बांधकाम, वाहने, अंगणातील फरशी धुण्यासाठी वापर करत आहेत. अमूल्य असलेल्या भूगर्भातील पाण्याचीही अशीच उधळपट्टी होत आहे.

मंगळवारी जायकवाडी धरण आणि डाव्या कालव्याच्या कामाची डॉ. कांबळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पैठणकडे जात असताना त्यांना अनेक ठिकाणी गळत्या, पाण्याची चोरीही दिसून आली. त्याची त्यांनी गंभीर दखल घेतली. सायंकाळी महापालिका मुख्यालयात परतल्यावर त्यांनी पाणी चोर, उधळपट्टी करणार्‍यांवर कारवाईसाठी पथके स्थापन करण्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, आगामी काळात जलसंकट अधिक तीव्र होणार आहे. म्हणून आताच चोरी, गैरवापरावर कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे. सध्या 49 टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. लवकरच आणखी 38 टँकर सुरू केले जाणार आहेत.

खासगी ‘जलतरण’ थांबणार?
जलतरण तलावातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलावाचे पाणी बंद केले. पण खासगी जलतरण तलावांमध्येही लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत डॉ. कांबळे यांनी दिले.

समांतरला वेळ
समांतरचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला असता त्यासाठी अजून बराच वेळ आहे. सध्या जायकवाडी येथील विहिरी, कालव्यातून गाळ काढण्याच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले.

हस्तक्षेप नको
मनपात कोणत्याही कारवाईमध्ये नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडून हस्तक्षेप होतो. त्यामुळे पाण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांवर आयुक्तांचेच नियंत्रण राहणार आहे.

असे असेल पथक
एका उपायुक्ताच्या अखत्यारीत एक पथक. दोन वॉर्ड अधिकारी किंवा एक वॉर्ड अधिकारी व एक अभियंता, तीन कार्यालय अधीक्षक दर्जाचे अधिकारी
अशी मिळेल माहिती मनपाच्या सफाई तसेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी शहराच्या कानाकोपर्‍यात फिरतात. त्यांच्यामार्फत पथकाला पाणीचोरी, उधळपट्टीची माहिती मिळू शकते.

पथकाची कार्यपद्धती
मिळालेल्या माहितीची घटनास्थळावर जाऊन पथकातील अधिकारी तपासणी करतील.
माहितीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर उधळपट्टी, चोरीचा पंचनामा केला जाईल.
उधळपट्टी, चोरीचे स्वरूप लक्षात घेऊन दंडाची आकारणी.
किती दंड आकारायचा याचा पूर्ण अधिकार पथकाच्या प्रमुखाला असेल.