आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा दिवस पाणी कसोटी, कंपनीचे कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीच्या कराराचे काउंटडाऊन सुरू असताना कंपनीतील शंभराहून अधिक कर्मचारी अधिकारी नवीन नोकरीच्या शोधार्थ भटकत असल्याने मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. जायकवाडीत गाळ गवतामुळे आधीच पाणी उपसा कमी झाला असताना आता शहरात अडचणी येत असल्याने जवळपास ४० वसाहतींचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ही स्थिती आणखी दहा दिवस राहणार असल्याने शहराला पाणी कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे मनपाच्या नोटिसीला कंपनीच्या वतीने उद्या उत्तर सोपवले जाणार आहे.

३० जून रोजी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेने समांतरचा करार रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानंतर जुलै राेजी कंपनीला मनपाने करार रद्दची नोटीस बजावून कंपनीला उत्तर देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली.

दरम्यानच्या काळात मनपाच्या वतीने पाणी योजना ताब्यात आल्यावर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरू केली. या काळात शहराचा पाणीपुरवठा कंपनीमार्फत केला जात आहे.

समांतरचे काम बंद होणार याची खात्री झाल्याने कंपनीतील कर्मचारी अधिकाऱ्यांत चलबिचल सुरू असून अनेकांनी दुसऱ्या नोकऱ्या शोधणे सुरू केले आहे. आता या आठवड्यात कोणत्याही क्षणी तो निर्णय होणार असल्याने या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. खास करून टाक्यांवरील आणि पाणी वितरण व्यवस्थेतील कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात असून त्यांनी कामावर येणेही बंद केले आहे.

दरम्यान, कर्मचारी तुटवड्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून सोमवारी सुमारे ४० वसाहतींचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तिकडे जायकवाडीत पाण्याची आवक सुरू असून येणाऱ्या पाण्यासोबत वाहून येणारा गाळ गवत पंपात अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचा परिणाम शहराला हवा तेवढा पाणी उपसा होण्यात झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार किमान दहा दिवस शहरासाठी पाणी कसोटीचे राहतील.

याबाबत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल म्हणाले की, पाणी योजनेच्या हस्तांतरणाची तयारी ते हस्तांतरण हा संक्रमणाचा काळ असून त्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीकडून अत्यावश्यक कामे करून घेतली जात आहेत. हाॅटेल व्हिट्सजवळ सिमेंट रस्त्याखालून जाणाऱ्या ७५० मिमी पाइपलाइनची गळती दुरुस्त करण्यात आली आहे.

मनपाच्या नोटिसीला कंपनीचे आज उत्तर
मनपाच्या नोटिसीला कंपनीच्या वतीने उद्या (२ आॅगस्ट) सकाळी उत्तर देण्यात येणार आहे. या उत्तराचा अभ्यास मनपाची वकिलांची टीम करणार असून त्यानंतर कंपनीला अधिकृतरीत्या करार रद्द केल्याचे सांगून पाणी योजना मनपा ताब्यात घेणार आहे. या प्रक्रियेला किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...