औरंगाबाद- भर उन्हाळ्यातही आनंदाची लहर उठविणारा होळीचा उत्सव. आजवर शहरात या उत्सवाचा रंगही काही और होता. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे या रंगोत्सवावर निरुत्साहाची छाया पसरली आहे. शहरात अनेक कुटुंबांनी हा उत्सव साजरा न करण्याचे ठरवले आहे, तर अनेकांनी कोरडी होळी खेळण्याचा संकल्प केला आहे. यंदा नागरिकांनी कोरड्या व नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, यासाठी लायन्स क्लब ऑफ डायमंडने पुढाकार घेतला आहे.
लायन्सचे विलास कोरडे यांनी यासाठी मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक रंग आणला आहे. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी आदी विविध रंगांची पॅकिंग करून त्याचे तरुण-तरुणींचे ग्रुप आणि घराघरांमध्ये वाटप सुरू केले आहे. सिडको परिसरातील एन 6,7,8,9 अशा परिसरांत सुमारे 2 हजार घरांमध्ये त्यांनी नैसर्गिक रंगांचे वाटप केले आहे.
आणखी 3 हजार घरांमध्ये वाटप करण्याचा लायन्सचा संकल्प आहे. यामध्ये रुक्सार शेख, ज्योत्स्ना हिवराळे, मीरा गुंड, पल्लवी भिसे, हर्षदा काळे, योगिता बोखडे या मुलींसह शिवराज कुलकर्णी, नागेश तरटे, वैभव कोरडे यांचा समावेश आहे. डॉ. योगिनी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व ग्रुप काम करीत आहे.
पाण्यासाठी प्रबोधनही
भूजल पातळी खूप खोल गेली असल्याने पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे. जलपुनर्भरणाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी येणार्या पावसाळ्यात प्रत्येकाने ‘रूफ टॉप हार्वेस्टिंग’ करावे, असे आवाहनही विलास कोरडे यांनी केले आहे. याशिवाय सांडपाण्याचा वापर करून झाडे जगवण्याचे आवाहनही ते महिलांना करत आहेत.
संदेशाचे मुद्दे
> शहर स्वच्छ व सुंदर ठेवा.
> केर कचर्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी करा.
> आपले आंगण, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा.
> झाडे लावून, त्यांची निगा राखा.
> प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर टाळा.
> अधिकृत ठिकाणीच होर्डिंग्ज, बॅनर्स लावावीत.
नागरिकांत उत्स्फूर्त प्रतिसाद
यंदा होळीला पाण्याची टंचाई असल्याने नागरिक आपणहून टिळा होळी साजरी करण्याचे मानस बोलून दाखवत आहेत. नैसर्गिक रंगाबाबतही आता जागरूकता वाढलेली असल्याने आमच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद आणि शुभेच्छा मिळत आहेत. डॉ.योगिनी पांचाळ
रंगांसोबत दिले जाते एक पॉम्प्लेटही
रंगांसोबत एक पॉम्प्लेटही दिले जात आहे. त्यात सगळे शहर स्वच्छ करायला निघू नका. फक्त वैयक्तिक पातळीवर स्वच्छतेला सुरुवात करा, शहर आपोआप सुंदर होईल, असा संदेश देण्यात आला आहे.