आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त शिवार’अभियानामुळे विहिरींची पातळी 2 मीटरने वाढली; पिकांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात आल्याने वाहून जाणाऱ्या पाण्याचा जागोजागी संचय झाला आहे. विहिरीची पाणीपातळी  दोन मीटरने वाढली आहे. शिवाय जलयुक्त शिवारात साचलेल्या पाण्यातून प्रथम १ लाख ४० हजार हेक्टर आणि दुसऱ्या पाळीसाठी ७० लाख हेक्टर असे २ लाख १० हजार हेक्टरवर क्षेत्र संरक्षित झाले आहे. यातून रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, सूर्यफूल, करडई आदी पिकांचे भरघोस उत्पादन घेता येणार आहे. पशुधन व वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.  

सततच्या दुष्काळावर मात करणे, शाश्वत सिंचन क्षेत्र वाढवणे,   पाणीटंचाई दूर करणे, पशुधन व वन्यजीवांना जागोजागी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, पावसाच्या खंडात पीक जगवणे, भूजलपातळीत वाढ करणे, शाश्वत पाण्यातून शेती समृद्ध व्हावी व शेतकऱ्यांना विविध पिके घेता येऊन त्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा करावी  यासारखे विविध कल्याणकारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या वतीने मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आठही जिल्ह्यांत ढाळीचे बांध, बांधबंदिस्ती, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, माती नाला बांधकाम, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, शेततळे, वनतळे, खोदतळे, सिमेंट नाला बांध, साठवण बंधारा, भूमिगत बंधारा,  कोल्हापुरी बंधारे, विहिरी व बोअरवेल पुनर्भरण, रिचार्ज शाफ्ट, शोषखड्‌डे, जलभंजन, जुन्या पाणीसाठ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, दुरुस्ती आदी कामे करण्यात आली आहेत. परतीचा मान्सून चांगला बरसल्यामुळे  मराठवाड्यात गतवर्षी ३.०९ लाख टीएमसी पाणीसाठ्याचे पोटेन्शियल झाले होते. २.५० मीटरने विहिरींची पाणीपातळी  वाढली होती. ६.६७ लाख हेक्टर शेती क्षेत्राचे सिंचन  होऊन उत्पादनात वाढ करण्यास फायदेशीर ठरले होते.  
 
जलयुक्त कामांचा आलेख असा  
५३८ गावांत १०० टक्के,  ४६८ गावांत  ८० टक्के कामे पूर्ण,  ३७२ गावांत ५० टक्के कामे पूर्ण  झाली आहेत.  गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाची शासकीय १४९६, लोकसहभागातून ७३८ अशी  एकूण २२३४ कामे झाली आहेत. यात  शासकीय यंत्रणेकडून  ९७.७५ लक्ष घ.मी.,  लोकसहभागातून १४५.५८ लक्ष घ. मी. असा  एकूण २४३.३३ लक्ष घ. मी. गाळ काढण्यात आला. यामुळे एकूण २४३३३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
 
उशिरा आलेल्या पावसाचा फायदा  
यंदा मान्सूनच्या वातावरणात सतत व्यत्यय आल्याने पावसाचे मोठे खंड पडले. उशिरा आलेला पाऊस चांगला झाला. परिणामी १.०९ लाख पाणी संचय झाले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत २ मीटर वाढ झाली आहे. दोन लाख दहा हजार हेक्टर शेती क्षेत्राची सिंचन व्यवस्था झाली आहे, अशी नोंद कृषी विभागाने घेऊन त्याचा अहवालही तयार केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...