आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या साठ्यात वाढ, ३३ टक्के साठा झाल्यास सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - तीन वर्षांनंतर जायकवाडीचा पाणीसाठा यंदाच्या पावसाळ्यात ४५ टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी एक पाणी पाळी देण्यात आली. मात्र, त्या नंतर जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने पाणीसाठा २७ टक्क्यांवर आला होता. दरम्यान, भंडारदरा, मुळातून ७.८९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडल्याने जायकवाडीचा पाणीसाठा आजघडीस ३२ टक्क्यांवर आला आहे. ३३ टक्के पाणीसाठा झाल्यावर सिंचनासाठी पाणी सोडण्याचा नियम असला तरी ठिबक व गळती रोखली जाणार असल्याने शेतीसाठी दुसरी पाणी पाळी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक ‘दिव्य मराठी’ने विशेष अभियान राबवत पाणी बचत करण्याचे आवाहन केले होते. जायकवाडी धरणातून होणारा अवैध पाणी उपसा, गळती व चोरीचा प्रश्न ‘दिव्य मराठी’ने सातत्याने प्रकाशझोतात आणला हाेता. यावर पाटबंधारे विभागाने यापुढे कोणत्याही ठिकाणी पाण्याची गळती होत असेल ती रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणार असून पाणी गळतीबरोबर पाणीचोरी रोखली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. भर्गोदेव यांनी सांगितले. सध्याचा धरणाचा पाणीसाठा पाहता आहे ते पाणी पिण्याबरोबर उद्योगाला वर्षभर पुरेल. मात्र, सिंचनाचा प्रश्न राहतो. मात्र, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून कमी दाबाने पाणी सोडले तर एक पाणी पाळी देणे शक्य होईल.

शिवाय ठिबकचा वापर केल्यास पाणी बचतदेखील होईल, असे नियोजन पाटबंधारे विभाग करत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. आणखी एक पाणी ठिबकवर देणे शक्य असल्याने रब्बीमधील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा ही पिके सहज वाचतील.

३२ टक्के साठा नाथसागरात
१७ डिसेंबर रोजी झाला.
२७ टक्के साठा नाथसागरात १० डिसेंबर रोजी होता.

या तालुक्यांना होईल फायदा
धरणाच्या कमी पाण्यावर केवळ चोरी व गळती रोखली जाणार असल्याने त्यानंतर डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले तरी पैठणसह जालना, गंगापूर, अंबड, परभणी, अहमदनगरमधील शेवगाव, पाथर्डी या भागातील ४० हजार हेक्टर्स क्षेत्र सहज ओलिताखाली येईल.

कठोर उपाययोजना कराव्यात
‘दिव्य मराठी’ने पाणी बचतीचे महत्त्व प्रशासनासह शेतक-यांना पटवून दिल्याने कमी पाण्यात शेती ओलिताखाली येईल. आता प्रशासनाने पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना कराव्यात
अप्पासाहेब पाटील, कृषितज्ज्ञ