आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात हजारो लिटर पाणी वाया; जनता जागरूक मात्र अधिकारी अनभिज्ञ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिंगाडा तलावाच्या गुरुद्वारारोड परिसरातील रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी अक्षरश: गटारीत वाहून गेले. रस्ता खोदताना नागरिकांना जलवाहिनीची माहिती देऊनही कर्मचार्‍यांनी निष्काळजीपणा केल्याने ही घटना घडल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि जलवाहिनी त्वरित दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आणि उद्योगांचे पाणीकपात करण्याचे धोरण आखले जात आहे. जिल्ह्यातील काही गावांना आज आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. घोटभर पाण्यासाठी लोक व्याकूळ होत असताना शहरात मात्र अनेक ठिकाणी पाणीगळतीच्या घटना घडत आहेत. दिवसभरात शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहेत. संदीप हॉटेल ते गुरुद्वारा रस्त्याच्या कामासाठी रविवारी सकाळी खोदकाम करण्यात आले. त्यात परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने दुपारी 3 वाजेपासून लाखो लिटर पाणी गटारीत वाहत होते. हेच पाणी खोदलेल्या रस्त्यात जमा झाल्याने त्या रस्त्याला खरोखरीच्या तलावाचेच स्वरूप प्राप्त झाले होते.

सर्वस्तरीय अनास्था
खोदकाम करण्यापूर्वीच कर्मचार्‍यांना जलवाहिनी असल्याबाबत माहिती दिली होती. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही, त्यामुळेच जलवाहिनी फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले.
-लक्ष्मण आहेर, नागरिक

>जलवाहिनी फुटल्याची माहिती तुमच्या द्वारेच मिळाली. फुटलेली जलवाहिनी त्वरित दुरुस्त करण्यात येईल.
-धर्माधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, पूर्व विभाग

>रविवारी सुटीचा दिवस आहे. अधिकारी कामावर येत नाहीत तर कसे काय दुरुस्त करता येईल? उद्या सकाळी कर्मचारी पाठवून दुरुस्ती करणे शक्य आहे. -गुलजार कोकणी, नगरसेवक