आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श वस्तुपाठ: जलव्यवस्थापनाने गौताळ्यात टंचाईवर मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात 260 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या गौताळा- औट्रम अभयारण्यात आजही अधिकार्‍यांच्या योग्य नियोजन व अंमलबजावणीमुळे परिक्षेत्रातील दोन्ही विहिरींना मुबलक पाणीसाठा आहे. नियोजन व कमी खर्चात येथे मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा असल्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच आहे.

परिसरात नागद, कन्नड व चाळीसगाव अशा तीन रेंज आहेत. यात 22 नैसर्गिक तर 28 कृत्रिम पाणवठे आहेत. तीन वर्षांपूर्वी ज्या गौताळा अभयारण्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. आज तेथे दुष्काळातही मुबलक व चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. वनपरिक्षेत्रात होणार्‍या पावसाचे पाणी डोंगराळ भागामुळे तीनशे फूट खोल खाली वाहून जाते. परिणामी या पावसाच्या पाण्याचा फायदा खालच्या गावांना होता. नेमकी हीच बाब हेरत विभागीय वनसंरक्षक वन्यजीव व्ही. जे. वरवंटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक एम. एस. देसले व निवासी वन अधिकारी नागापूरकर यांनी 2010 मध्ये डोंगराच्या उतारावर असलेल्या चंदननाला परिसरात टप्प्याने चार सिमेंट बंधारे बांधून पावसाचे वाहणारे पाणी अडवले व जिरवले. जिरलेले पाणी जमा होण्यासाठी तळाला खाली विहीर तयार केल्याने दुष्काळात ही विहीर काठोकाठ भरलेली आहे.

जमदारा परिक्षेत्रातील विहिरीत दोन लाख लिटर पाणीसाठा
जमदारा वनपरिक्षेत्रात सुमारे दोन किलोमीटर आतमध्ये 50 फूट खोल विहीर आहे. या विहिरीतून येथील तीन कृत्रिम पाणवठय़ांवर पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी लिफ्ट करून हे पाणी विर्शामगृह परिसरातील सुमारे 55 फूट उंच व 50 हजार लिटरची क्षमतेची टाकी भरण्यात येते. पाणी जनरेटरद्वारे प्रथम लिफ्ट करून पाइपवर असलेले नॉन डिटेनिंग व्हॉल्व्हद्वारे (गुरुत्वाकर्षणाने) टाकीत सोडले जाते. या टाकीतून विर्शामगृहाची व एक किलोमीटर जवळच असलेल्या पुरणवाडी येथील अधिकार्‍यांच्या निवासस्थानांना पाणी पुरवले जाते. पुरणवाडी गावात पाण्याची वणवा असून गावात टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. मात्र निवासस्थानांत वन विभागाचे स्वत:चे पाणी येते. येथे विर्शामगृह व निवासस्थाने मिळून सुमारे दररोज दोन हजार लिटर पाण्याची गरज आहे, तर जामदारा विहिरीत आजमितीस 2 लाख लिटर पाणीसाठा आहे. एकदा विर्शामगृहाची टाकी भरली की ती महिनाभर पुरते. म्हणजेच आज दोन लाख लिटर पाणी चार महिने जूनपर्यंत पुरेल, असे नियोजन आहे.

पाण्याचा प्रश्न सुटला
चंदननाल्यात सिमेंटचे चार बंधारे असून दुसरा बंधारा पावसाळ्यात किमान पाच ते दहा वेळा भरतो यात एकावेळी भरल्यावर सुमारे 2 लाख 70 हजार लिटर पाणी जमा होते. कालांतराने हे पाणी पावसाळ्यानंतर जमिनीत मुरते व टप्प्याटप्प्याने खालच्या बंधार्‍यातून विहिरीत झिरपते. आज बंधारे जरी कोरडे असले तरी पावसाळ्यातील अडवून मुरलेल्या पाण्यामुळे खालची विहीर पूर्णपणे भरली आहे. वनपरिक्षेत्रात वीज नसल्याने जनरेटरने पाणी लिफ्ट करून टाकीपर्यंत पोहोचवले जाते व टाकी 55 ते 60 फूट उंचीवर असल्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे विनामोटारीचे थेट कृत्रिम पाणवठय़ांपर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचते.

पर्यटकांसाठी सहा व्ह्यू पॉइंट
पावसाळ्यात येथे मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. वन विभागाच्या वतीने 2007 मध्ये येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व निरीक्षणासाठी सहा व्ह्यू पॉइंट तयार केले आहेत, तर पुरणवाडी विर्शामगृहासमोर माहिती केंद्र तयार करण्यात आले असून लवकरच पर्यटकांसाठी ते खुले होणार आहे.

वन्यजीव, औषधी वनस्पती
येथे बिबटे, चिंकारा, कोल्हे, हरिण, तरस, नीलगाय, सायाळ, रानडुकरे, रोही, भेकर, ससे आदींसह मोठय़ा प्रमाणावर वन्यजीवांना संरक्षण मिळते, तर पळस, तेंदू, सागासह मोठय़ा संख्येने औषधी वनस्पती आढळते.