आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांनी पाण्याच्या वापरात सुधारणा करावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जल व्यवस्थापनाच्या बाबतीत ‘बॅड बॉइज’ प्रतिमा निर्माण झालेल्या उद्योगक्षेत्राने पाण्याच्या बाबतीत प्राधान्य पटवून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले. वाढती मागणी आणि उपलब्ध पाणी ध्यानात घेऊन आगामी काळात जल व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा राहणार असल्याचेही ते म्हणाले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआयच्या वतीने गुरुवारी जल व्यवस्थापनासंदर्भात एक दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत उद्योग जगतातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जल व्यवस्थापनाशी संबंधित विविध पैलूंवर भूमिका मांडली. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी बीजभाषण केले. व्यासपीठावर जिल्हाधिकारी विक्रमकुमार, सीआयआय महाराष्ट्राचे अध्यक्ष निनाद करपे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, परिषदेचे संयोजक मुकुंद बडवे उपस्थित होते. डॉ. चितळे म्हणाले, जल संवर्धन, जल प्रदूषण, जल व्यवस्थापन या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यासंदर्भात आपली वर्तणूक बदलण्याची गरज आहे. उद्योगांनी आपल्याला मिळणारे पाणी, प्रक्रियेदरम्यान होणारा वापर आणि शुद्धीकरण या तीन घटकांचा समावेश करून पाण्याचे व्यवस्थापन करायला हवे. पाण्यासंदर्भात धोरण ठरवताना उद्योगांनी पूरक आणि सर्मपक तपशील गोळा करायला हवा. डॉ. चितळे म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उठणार्‍या संशयामुळे जल व्यवस्थापनाबाबत उद्योगांवर ‘बॅड बॉइज’चा शिक्का बसला आहे. स्वीडन, र्जमनी आणि जपानसारख्या देशांनी जल व्यवस्थापनात अग्रक्रमांक ठेवला आहे. त्यांची यशगाथा आपण येथे वापरात आणू शकतो. उद्योगांनी त्यात पुढाकार घ्यायला हवा.

जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले, दुष्काळाचा मुकाबला करण्यावर आतापर्यंत 8 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. जिल्ह्यात 1370 पैकी 1176 खेड्यांना टँकरशिवाय पर्यायच नव्हता. आता आपण आपले जलस्रोत मजबूत करून त्याचे व्यवस्थापन तातडीने करायची गरज आहे. निनाद करपे म्हणाले, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सीआयआयने पुढाकार घेतला होता. प्रशासनानेही त्यात सहकार्य केले. सीआयआयने पाणी ही थीम घेऊन वॉटर मिशन हाती घेतले आहे. जलतज्ज्ञ विजय केडिया, वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट ग्रीन सिस्टिम्सच्या अनामित्रा खान, मित्सुबिशी इलेक्ट्रिकचे अभय घुले, मेम्ब्रान सिस्टिम्सचे अनिल शहा, प्राज इंडस्ट्रीजचे अमित उदगीरकर, एन्ड्रेस हाऊजरचे सुनील भोर, निसर्ग मित्र मंडळाचे डॉ. विजय दिवाण, पेप्सिकोचे आशिष शर्मा, ऋषीकुमार बागला, प्रशांत देशपांडे यांची भाषणे झाली.