आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समांतरला विरोध नाही, अंमलबजावणीत अडचण; आयुक्त डॉ.कांबळे यांचा इरादा जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समांतर जलवाहिनी प्रकल्पाला माझा विरोध नाही, पण त्याच्या अंमलबजावणीत अडचण आहे. मात्र, कागदपत्रे सादर करणे, लेखाबंद करणे या कामासाठी आता 31 ऑगस्टची डेडलाइन कंत्राटदारांना देण्यात आली आहे, असे सांगत मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी समांतरबाबत पुन्हा कठोर इरादा जाहीर केला. 55 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर ताजेतवाने होऊन परतलेल्या आयुक्तांनी खड्डय़ांच्या विषयावर बोलताना ‘जिथे जिथे खड्डे आहेत ते बुजवू’ असे सांगितले.

मसुरी आणि कॅनडा येथे प्रशिक्षण घेऊन परतलेले मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सोमवारी मनपाचा कारभार हाती घेतला आणि पाच जणांच्या बदल्यांना स्थगिती देत पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या युतीला दणका दिला. मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्त विरुद्ध सत्ताधारी अशा संघर्षाचे मूळ असणार्‍या समांतर जलवाहिनी, मनपात 55 दिवसांत घडलेल्या घडामोडी, बदल्या, खड्डे या सगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य करीत आपले धोरण नरम राहणार नाही, असेच सांगितले.

समांतरला विरोध नाही, पण..

आयुक्त म्हणाले, शहराला 24 तास पाणी मिळाले पाहिजे ही संकल्पना चांगलीच आहे. त्यामुळे माझा समांतरला विरोध नाही, पण त्याच्या अंमलबजावणीत अडचणी आहेत. मनपाने नोटीस दिल्यावर कंत्राटदारांनी हायकोर्टात धाव घेऊन संधी मागितली होती. त्यानुसार प्रभारी आयुक्तांनी बैठक घेऊन मार्ग काढला. अटींची पूर्तता करण्याची कंत्राटदारांनी तयारी दाखवली आहे. आता कागदपत्रांची पूर्तता आणि लेखाबंदला 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही एक याचिका आहे, शिवाय एक जनहित याचिका आहेच. समांतरबाबत आयुक्तांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळेच पदाधिकार्‍यांसोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. कंत्राटदाराने 31 ऑगस्टची डेडलाइन पाळली नाही, तर पुन्हा समांतरवरून भडका उडणार आहे.

आधी आढावा, मग बदल्या
प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी घेतलेल्या निर्णयांवर जाहीर बोलणे टाळताना डॉ. कांबळे यांनी मवारे यांनी त्यांना योग्य वाटले तसे निर्णय घेतले, असे सांगितले. मुळात उलथापालथ करायला मी फारसा वाव ठेवला नव्हता, असे ते म्हणाले. मनपाचे उत्पन्न वाढले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. मी 900 कोटींचे बजेट पाहिले. पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न आहे. सगळ्या विभागांकडून माहिती मागवली आहे. या सगळ्यांचा आढावा घेऊन निर्णय घ्यायचे असल्याने बदल्यांना स्थगिती दिली आहे. मनपात काय चालले आहे ते इंटरनेटवर वाचत असे. आढावा घेतल्यानंतर नेमके काय झाले ते लक्षात येईल, असे सांगत आयुक्तांनी मवारेंच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांचा फेरविचार होऊ शकतो, असे थेट सूचितच केले.