औरंगाबाद - मोंढा नाका उड्डाणपुलाखाली जलवाहिनी स्थलांतराच्या नावाखाली सिल्लेखाना चौकातील काम महापालिकेने सहा महिन्यांपासून बंद ठेवले आहे. यामुळे दररोज हजारो वाहनचालकांचे हाल होत आहेत. मोंढा नाक्यात पूल उभारणी होत असल्याने वाहतुकीवर ताण वाढू शकतो. म्हणून सिल्लेखाना चौकात पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरणाचे काम करू नका, असे वाहतूक विभागाने सांगितल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, ही सूचना केवळ सप्टेंबर २०१४ मधील सहा दिवसांपुरतीच होती, असे वाहतूक उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील सर्वच रस्त्यात खड्डे असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. याबाबत "दिव्य मराठी'नेही रस्ते दुरुस्ती मोहिमेसाठी अभियान चालवले. त्याची दखल घेत प्रमुख रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग करण्याचा निर्णय झाला. त्यात क्रांती चौकातील शिवाजी महाराज पुतळा ते पैठणगेट रस्त्याचा समावेश होता. त्यानुसार शिवाजी महाराज पुतळा ते सिल्लेखाना आणि सिल्लेखाना ते रॉक्सी कॉर्नरपर्यंत काम झाले. मात्र, सुमारे ३०० फूट लांब, ३०० फूट रुंदीचा सिल्लेखाना चौक तसाच ठेवण्यात आला आहे. तेथे मोठे खड्डे पडले आहेत. खडी उखडली आहे. यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
शंभर ते दीडशे दुकाने
क्रांतीचौक ते पैठणगेट या भागात अनेक अॅाटोमोबाइल, ज्यूस सेंटर, झेरॉक्स सेंटर, हॉटेल्स, हॉस्पिटल अशी शंभर ते दीडशे दुकाने आहेत. काँक्रिटीकरणामुळे रस्त्याच्या दुतर्फामध्ये वाहनधारकांना पार्किंगची जागा राहिलेली नाही. सिल्लेखाना चौकात आल्यानंतर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपुरते पत्र
वाहतूक विभागाचे उपायुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मोंढा नाका जलवाहिनी स्थलांतराचे काम ठेकेदाराने हाती घेतले होते. त्या वेळी जालना रोडवर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने वाहने सिल्लेखान्यातूनच वळवण्याचे ठरले होते. म्हणून सिल्लेखाना चौकाचे काम काही दिवस करू नये, असे पत्र त्यावेळी दिले होते. त्याचा अर्थ काम करूच नका, असा होत नाही.
तारीख सांगता येणार नाही
उप अभियंतापी. जी. पवार यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, मोंढानाका उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतूक क्रांती चौकातून सिल्लेखाना ते मोंढा नाका अशी वळवण्यात आली होती. त्या वेळी वाहतूक विभागानेच काम करू नका, असे कळवले होेते. आता लवकरच चौकाचे काँक्रिटीकरण होईल. त्याची निश्चित तारीख सांगता येणार नाही.
वर्षभरापासून रखडले काम
शिवाजीमहाराज पुतळा ते सिल्लेखाना हा ३० मीटरचा रस्ता मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यांत पूर्ण झाला. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सिल्लेखाना चौक ते रॉक्सी टॉकीज हा रस्ता पूर्ण झाला. एकूणच रस्त्यासाठी महानगरपालिकेने कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली असून त्यात सिल्लेखाना चौकाचाही समावेश आहे. मात्र, हे काम करण्याची कोणतीही घाई मनपाच्या अभियंत्यांना नाही. त्यासाठी त्यांनी वाहतूक विभागाकडे बोट दाखवले आहे.
एकमेव मार्ग
पैठणगेटला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. बाजारपेठ असल्यामुळे खूपदा येणे-जाणे असते. मात्र चौकात माती, रेती, खडीमुळे वाहन चालविता येत नाही. सचिनजोशी, रहिवासी
मनपाचे दुर्लक्ष
सिल्लेखाना चौकातील काम काही महिन्यांपासून झालेले नाही. वाहतुकीची कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होते. लाखो वाहने ये-जा करीत असताना मनपाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रवी औरंगाबादकर, रहिवासी
पाठीला त्रास होतो
खड्डेमय रस्ता, दगड, खडी आणि सिमेंट रस्ता दुसर्या रस्त्याला व्यवस्थित जोडल्यामुळे खड्डा पडला आहे. वाहने आदळतात, पाठीला त्रास होतो. सूरजबडग, रहिवासी
जनहित याचिका
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मणक्याचे पाठीचे आजार होत आहे. हा रहादारीचा रस्ता असताना एक वर्षभरापासून काम रखडले असून त्रासदायक ठरत असेल. तसेच नागरिकांचे नुकसान होत असेल तर यावर उच्च न्यायालयात कोणतीही व्यक्ती जनहित याचिका दाखल करू शकते. अॅड.उद्धव वाघ