आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मच्छिंद्रनाथ देतोय हर्सूलकरांना मोफत ‘जीवन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गावकर्‍यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर्सूल गावातील एका तरुणाने जल वितरण सेवा सुरू केली आहे. मागील चार वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने अखंडपणे तो ही सेवा पुरवत आहे. पाणी हेच जीवन आहे आणि त्याचीच पूर्तता करून आपण समाजासाठी काही तरी केल्याचे मनापासून समाधान मिळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत पर्जन्यमानाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे गावागावात अगदी भर पावसाळ्यातही लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यात यंदा जून महिना संपत आला तरी वरुणराजाची कृपा झालेली नाही. परिणामी दर चार-आठ दिवसांना निर्जळीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. याची सर्वाधिक झळ मनपा हद्दीतील हर्सूलकर सोसत आहेत. या गावाच्या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीही जोडलेली नसल्याने कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी नळाला पाणी येते. अशा परिस्थितीत गावकर्‍यांना पाण्यासाठी रानावनात पायपीट करावी लागत होती. गावकर्‍यांची ही अवस्था पाहूनच हर्सूलमधील मच्छिंद्रनाथ हरणे या तरुणाने गावात मोफत पाणी वाटप करण्याचे ठरवले. चार वर्षांपूर्वी त्याने एक जुने ट्रॅक्टर आणि टँकर बनवून घेतले. आता त्यातून तो गावकर्‍यांना मोफत पाणी देत आहे.

रोज 20 हजार लिटर पाणी
मच्छिंद्र गावातील सांगळे गल्ली, धनगर गल्ली, मुल्ला व हरसिद्धी माता मंदिर परिसरात दररोज 5 हजार लिटरचे चार टँकर पाणी वाटतो. त्यामुळे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त गावातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या स्थापनेनंतर हर्सूलही मनपा हद्दीत आले, परंतु आजही हर्सूलकर मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणी, वीजपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. त्यातच शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मनपाने काही टँकर सुरू केले आहेत, मात्र हर्सूलमध्ये टँकर दिले जात नाही. गावाच्या हद्दीत तळे असूनही त्याचे पाणी गावाला मिळत नाही. त्यामुळे ‘तळे उशाला अन् कोरड घशाला’ अशी परिस्थिती आहे. काही नागरिक स्वखर्चाने टँकर मागवतात, परंतु गोरगरिबांची परवड होत आहे. अशा स्थितीत मच्छिंद्रनाथने सुरू केलेली जय मल्हार मोफत जल वितरण सेवा हर्सूलकरांची तहान भागवत आहे.
मानसिक समाधान मिळते
४चार वर्षांपूर्वी एक टँकर व ट्रक्टर विकत घेतले. तेव्हा पाणीटंचाई असल्याने आपल्याच गावातील नागरिकांची गैरसोय पाहून जय मल्हार मोफत जल वितरण सेवा सुरू केली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या जाणिवेतून हे कार्य करत आहे. यातून मानसिक समाधान मिळते.
- मच्छिंद्रनाथ हरणे

मच्छिंद्रमुळे मिळते पाणी

४आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नाही. गेल्या चार वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये मच्छिंद्रनाथ दररोज आम्हाला पाणी पुरवतो. त्यामुळे आमची गैरसोय न होता वेळेवर पाणी मिळत आहे.
- हिराबाई सुरे, गावकरी

मोठा आधार वाटतो

४जय मल्हार मोफत जल वितरण सेवेमुळे हर्सूलकरांना मोठा आधार झाला. नाही तर आम्हाला पाण्यासाठी पायपीट करत शेतातून पाणी आणावे लागले असते. मनपा तर आमच्याकडे लक्ष द्यायलाही तयार नाही.
- अनिता पवार, गावकरी