आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढग आकाशात, पाणी डोळ्यात; जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री / औरंगाबाद - पाऊस लांबल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर आकाशात काळे ढग जमतात, परंतु काही केल्या पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

जिल्ह्यात कुठेच पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मशागत पूर्ण होऊन 20 दिवस झाले, तरी पाऊस येत नसल्याचे पाहून बळीराजा आता देवाकडे साकडे घालू लागला आहे. ग्रामीण भागातील जुने जाणते शेतकरी आषाढी एकादशीला हमखास पाऊस पडतो असे सांगतात, त्यामुळे आता सर्व शेतकर्‍यांच्या नजरा आषाढी एकादशीकडे आहेत. रोहिण्या व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपाची पेरणी लांबली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याचे मत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.
प्रशासनाची कसोटी : पाऊस लांबल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडले असून टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एकट्या फुलंब्री तालुक्यात पाण्यासाठी 17 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जून महिन्यात आठवडी बाजारात लाखोंची उलाढाल होत असे, परंतु सध्या बाजार ओस पडत आहेत. खर्च करताना शेतकरी आखडता हात घेत आहे. चारा नसल्याने काही शेतकरी आपले पशुधन कवडीमोल भावाने विक्री करत आहेत. एकूणच निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व घटकांवर विपरीत परिणाम होत आहे.

दुबार पेरणीचे संकट
काही शेतकर्‍यांनी थोड्याफार पावसाच्या भरवशावर धूळ पेरणी करण्याचे धाडस केले, परंतु ते नुकसानीचे ठरले. पावसाअभावी सरकी व इतर पिकांची बियाणेमोड येऊन बाहेर न येता जमिनीतच कुजले आहेत. महागामोलाचे बियाणे मातीत गेल्याने आता शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

शेतकरी पंढरीच्या वाटेवर
काही शेतकर्‍यांनी शेतीची सर्व मशागतीचे कामे आवरून आपल्या शेतीला देव व दैवाच्या भरवशावर सोडून पंढरीस जाणे पसंत केले असून वारकरी पाण्यासाठी विठुरायाला साकडे घालण्यास निघाले आहेत.

पशुधन बाजारात
पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला, तरीही अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. शिवाय पाण्याअभावी जनावरांच्या चार्‍याच्या प्रश्नानेदेखील गंभीर रूप धारण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चारा- पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांना पशुधन बाजारात विक्री करण्याची वेळ आली आहे.

छायाचित्र - माझ्याकडे 10 गाई व 7 वासरे असून मी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करतो, परंतु चार्‍याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसत असल्याने मी 2 गायी व 2 वासरे विकली आहेत. बाकी जनावरांना उरलेला चारा पुरवून वापरत आहे.- विठ्ठल दौड, शेतकरी