आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायपीट । शिरजमाळ गावात वीज पुरवठ्याअभावी सहा महिन्यांपासून पाण्याचे वांधे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबादपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या; पण औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या शिरजमाळ गावात गेल्या सहा महिन्यांपासून थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला असल्याने वृद्ध व महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अखेर लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी विहीर खोदण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे पाणी आणण्यासाठी महिला, मुले व वृद्धांचीही यातून सुटका नाही.
खुलताबाद जवळ असूनही डोंगरदर्‍यातील शिरजमाळ हे औरंगाबाद तालुक्यातील दौलताबाद ग्रामपंचायतीला जोडलेले आहे. स्वातंत्र्यापासून हे गाव खुलताबाद तालुक्यात असूनही ते औरंगाबाद तालुक्यात आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 500 एवढी आहे. गाव डोंगरात असल्याने संपूर्ण परिसर खडकाळ आहे. त्यामुळे येथे शेती उत्पादन घेण्यायोग्य जमिनी नाहीत. वृद्ध आई-वडील व मुलांना शाळेसाठी गावात राहावे लागते. कमावते व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी कामधंदा करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा विहीर गेल्या 20 वर्षांपासून आहे. विहिरीजवळ मोठे तळे असल्याने विहिरीला मुबलक पाणी राहते. मात्र, दौलताबाद गु्रप ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहिरीचे सुमारे सव्वालाख रुपये वीज बिल थकवल्याने गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे. सहा महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने गावातील शाळकरी मुले व वयोवृद्ध महिला व पुरुष डोंगरदर्‍यातून मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी दोन- तीन किलोमीटर पायपीट करत असल्याचे भीषण चित्र आहे. पाणी पुरवठ्याची विहीर गावापासून दूर असल्याने हंडाभर पाण्यासाठी डोंगर तुडवत कडीकपार्‍यांतून वृद्धांना पायपीट करावी लागत असल्याने गावात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अंगणातील रांजण भरण्यासाठी वृद्धांना अर्धा दिवस पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हिवाळ्यात पाण्याची परिस्थिती भीषण झाली असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धरण करण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाणीपुरवठ्याची विहीर खोदल्यापासून आतापर्यंत आम्हाला केवळ एकदाच नळपट्टी व घरपट्टी बिले देण्यात आली आहे. त्यानंतर अद्याप एकही बिल देण्यात आले नाही. आम्हाला नळ व घरपट्टीची बिले दिल्यास ती भरण्यास आम्ही तयार आहोत.
गावातील समस्या जाणून घेण्यासाठी सहा महिन्यांपासून कोणताही अधिकारी गावात अद्याप फिरकला नाही. गावात कोणीही सुशिक्षित नसल्याने समस्या मांडता येत नाही.
गावात कोणतेही अधिकारी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यास येत नाहीत. गाव दुष्काळी भागात असूनही कोणताही दुष्काळी निधी गावाला मिळाला नाही. शासनाला जर शिरजमाळ गावाकडे लक्ष द्यावयाचे नाही, तर आपल्या यादीतून हे गाव वगळावे. आम्ही आमचे जीवन जगू. येत्या आठ दिवसांत गावातील पाण्याची समस्या सुटली नाही तर आम्ही आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सुंदराबाई जाधव, रामलाल राठोड, भामाबाई चव्हाण, हिराबाई चव्हाण, रतनाबाई राठोड, तोताबाई चव्हाण आदी वृद्धांनी देत संताप व्यक्त केला आहे.