आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problem In Villages, Bride Fathers Find City Groom For Daughter

गावागावात तीव्र जलसंकट; वधूपित्यांची शहरांकडे धाव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - भीषणपाणी टंचाईमुळे बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळे ग्रामीण भागात टंचाईचे चटके तीव्र झाले आहेत. दररोजच्या वापरासाठी पाणी मिळत नसल्यामुळे शहर परिसरातील वधूपित्यांनी विवाहसोहळ्यांसाठी शहरातील मंगल कार्यालयांना पसंती दिली आहे. त्यामुळे खर्च वाढणार असला तरी कार्यात अडचण उभी राहणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
बहुतांश गावांतील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे पिण्यासह वापरण्यापुरते पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना धावपळ करावी लागत आहे. त्यातच घरी एखादा कार्यक्रम असेल तर ही चिंता आणखी वाढते. औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांत पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून अशा परिस्थितीत विवाहसोहळ्याचे नियोजन करणे अवघड ठरत आहे. त्यामुळे थेट शहरात येऊन कार्यक्रम आटोपणे बरे, असे अनेकांना वाटप आहे.

तालुक्यातील अंजनडोह येथील सुधाकर कोंडीराम त्रिभुवन यांनी त्यामुळेच मुलीचा विवाह औरंगाबाद शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात हा सोहळा करायचे ठरवले तर स्वयंपाक तसेच मंगल कार्यालयाचा खर्च वाचला असता. परंतु तेथे पाणी आणण्याचा खर्च वाढला असता. मात्र, खर्च करूनही पिण्यालायक पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी बीड बायपास येथील एक मंगल कार्यालय भाड्याने घेतले. शुद्ध पाण्याची व्यवस्था मंगल कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी त्यासाठी काही पैसे मोजले; पण केवळ पाणी नसल्यामुळे विवाहसोहळा गावात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या परिचयातील दोघांनीही याच कारणामुळे आपला गाव सोडून शहरात विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात खर्च जास्तीचा येत असला तरी पाणी मात्र मुबलक मिळतेच, शिवाय कार्य निर्विघ्न पार पडल्याचे समाधानही मिळते, असे त्रिभुवन यांनी सांगितले.

गावात पाणीच नाही
^गावात पाणीच नाही. लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडीला पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न होता. त्यामुळे पाण्याची शोधाशोध करण्यापेक्षा शहरातील मंगल कार्यालय आम्ही शोधले, अन्यथा यंदा मुलीचा विवाह करणे अवघड होते. - सुधाकर त्रिभुवन, वधूपिता.अंजनडोह.

व्यवस्था करणार कशी
दररोज लागणारे पाणी मिळवतानाच धांदल उडते. मग वऱ्हाडी मंडळींना पाणी द्यायचे कसे, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाण्याचे काय, हे प्रश्न सोडवण्यासाठी वधूपित्यांनी मंगल कार्यालयांचा पर्याय निवडला आहे. मात्र, त्यामुळे खर्च वाढणार असून त्यासाठी तजवीज करण्यासाठी वधूपित्यांची धावपळ सुरू आहे.