आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problem Issue At Aurangabad, Divya Marathi

हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -वॉर्ड क्रमांक 81 जयभवानीनगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून पाणी न आल्याने जलवाहिन्या कोरड्या पडल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. आम्हाला पाणी कधी मिळणार ? निदान टंचाईच्या काळात टँकर तरी उपलब्ध करून द्या, आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आवाज का उठवत नाहीत, यासारखे प्रश्न विचारत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी भाजपचे नगरसेवक बाळासाहेब मुंढे यांना घेराव घातला.

जिजामाता कॉलनीवासीयांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे.पालिकेला भरघोस पाणीपट्टी भरूनही काही नागरिकांना टँकरने पाणी आणावे लागत आहे. नगरसेवकांनी पुढाकार घेऊन उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे पाण्यासाठीची पायपीट तरी थांबेल, अशी मागणी संतप्त महिलांनी नगरसेवकांकडे केली आहे.

आठवड्यातून एकदा येणारे पाणी दुर्गंधीयुक्त असून अळ्या आणि कचरा येत आहे.दूषित पाण्याची तक्रार केली असता पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत.दूषित पाण्याची तक्रार सोडवण्यासाठी नगरसेवक तत्परता दाखवतात, मात्र त्यांचेही अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात.त्यामुळे समस्या ‘जैसे थे’राहते, असेही नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वसाहतीला सिडको एन - 5 च्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनी आणि अंतर्गत जलवाहिन्या 15 वर्षाच्या जुनाट असल्याने व जागोजागी सांडपाण्याच्या गटारांचा विळखा असल्याने त्या गंजलेल्या आहेत.या शिवाय कमी व्यासाच्या आहेत. त्या बदलण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी पूर्ण करण्यास पालिका टाळाटाळ करत आहे.