आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैजापूर -नाशिक पाटबंधारे विभागाने 20 डिसेंबर रोजी रात्री नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यात सोडलेले पाणी वैजापूर लाभक्षेत्रात रविवारी सकाळी दाखल झाले. नांमका विभागाने पाटबंधारे विभागाच्या ‘टेल टू हेड’ या नियमाप्रमाणे पाण्याचा प्रथम लाभ गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांना मिळणार आहे. त्यानंतर वैजापूर व कोपरगाव असे पाणीवाटपाचे नियोजन आखले आहे.
वैजापूर-गंगापूर तालुक्यांसाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडून रब्बी हंगामातील पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यात लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या आग्रही मागणीवरून 1.30 टीएमसी पाणी 20 डिसेंबर रोजी 600 क्सुसेक वेगाने कालव्यात सोडण्यात आले आहे. वैजापूर, गंगापूर, कोपरगाव तालुक्यातील 11 हजार हेक्टरवरील पिकांना या पाण्याचा लाभ देण्याचे नियोजन नांमका प्रकल्प कार्यालयाने आखले आहे. या नियोजनानुसार गंगापूरला सहा दिवस, वैजापूरला 9 दिवस व कोपरगावला 2 दिवस असे एकूण सतरा दिवस पाणीवाटपाचे नियोजन असल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले.
पाणी आवर्तनाचे दिवस घटले
18 डिसेंबरला शेतकर्यांच्या जमावाने नांमकाचे कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला दिलेल्या पत्रात 28 दिवसांसाठी 1.30 टीएमसी पाणी सोडण्याचे सांगितले होते. मात्र, नांमकाने अवघे 17 दिवस पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
रोटेशेन न मिळाल्यास आंदोलन
नांमकाने शेतकर्यांसमक्ष 28 दिवसांचे पाणी आवर्तन न सोडल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडून अधिकार्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब जगताप, कल्याण पाटील जगताप यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांची सोमवारी भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.