आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problems Issue At Aurangabad, Divya Marathi

नियोजनाची बोंब, पाणी असून टंचाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठय़ाची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांचे हाल होत असून याबाबत मनपाने काहीच कार्यवाही न केल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.

शहरात पाण्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागाकडून नानाविध कारणे सांगून वेळ मारून नेली जात असल्याने आज थेट मुळापासून या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी उपमहापौर संजय जोशी यांनी जायकवाडीतील पंप हाऊस, फारोळ्याचे जलशुद्धीकरण केंद्र यांना भेटी देत माहिती घेतली. जायकवाडीतील नवीन पंपहाऊसमधील पाच आणि जुन्या पंपहाऊसमधील तीन असे एकूण आठ पंप पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा करीत आहेत.

उपसा वाढला
उपअभियंता यू. जी. शिरसाट यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात दररोज पाण्याचा सरासरी उपसा 150 एमएलडी होता. फेब्रुवारी, मार्चमध्ये तो साधारण याच प्रमाणात होता. एप्रिलपासून उपसा वाढवावा लागला. कारण मागणी वाढत आहे. मे महिन्यात आता पाण्याचा उपसा 155 ते 158 एमएलडी होत आहे. म्हणजेच जानेवारीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. ही या पंपांची अंतिम क्षमता आहे.

पाणी पुरेसे
जायकवाडी धरणातही यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. आज 7 मे रोजीचा उपयुक्त जलसाठा 10.74 टक्के आहे. हा साठा पावसाळा सुरू होईपर्यंत व्यवस्थित वापरात येणार आहे. त्यामुळे पाणी नाही असे संकट येणे अशक्य आहे. फक्त त्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणीपुरवठय़ाचे तीनतेरा वाजले आहेत.
फारोळ्यात काय ?
फारोळ्याच्या जलशुद्धीकरण केंद्रात जायकवाडीतून येणार्‍या पाण्याचे शुद्धीकरणही पूर्ण क्षमतेने सुरू आहे. धरणातून येणार्‍या पाण्याचा दर्जा खराब असल्याने शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक बारकाईने केली जात असल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. ते म्हणाले की, आलेल्या पाण्याची शुद्धीकरणाआधीची क्लोरिनेशनची प्रक्रिया वाढवण्यात आली आहे. आधी या प्रक्रियेसाठी एका एमएलडीला एक किलो क्लोरिन वापरले जायचे. ते आता चार किलो वापरावे लागत आहे. त्यामुळे पाण्याची अशुद्धता नियंत्रणात आणली जाते. जायकवाडीतून येणारे दीडशे एमएलडी पाणी या प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने शुद्धीकरण करूनच शहरात पाठवले जाते.
टाक्यांपासून घोळ
औरंगाबाद शहरातील विविध भागांत 52 टाक्या आहेत. जायकवाडीतून फारोळय़ात, तेथून नक्षत्रवाडीत आणि तेथून या टाक्यांत असा 150 एमएलडी पाण्याचा प्रवास होतो. तेथून नागरिकांच्या नळांपर्यंत वितरण होते. पाण्याचा घोळ याच भागात होत आहे. आलेल्या पाण्याने टाक्या भरून घेणे व त्याचा पुरवठा करणे याचे सगळे गणितच कोलमडले आहे. त्यातून पाणी असून टंचाई, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
नेमके काय होते?
नक्षत्रवाडीतून येणार्‍या पाण्याने टाक्या पूर्ण भरल्यावर ते नियमित वेळेला सोडणे हेच काम पुरवठा विभागाकडून योग्य नियोजन नसल्याने होत नाही. कमी पातळी असताना पाणी सोडले जाते, मग टाकी रिकामी झाल्यावर ती भरण्यासाठी पुन्हा वेळ लागतो. हे वेळेचे गणित एकदा कोलमडले की, सुरळीत होतच नाही. दोन दिवसांआड पाणीपुरवठा असला तरी काही निवडक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अनेक भागांत नियोजित वेळापत्रकाआधी अथवा नंतर पाणी सोडावे लागण्याचे प्रकार होतच राहतात. पाण्याची विशिष्ट लेव्हल आल्याशिवाय पाणी सोडण्यात येत असल्याने सगळे गणित कोलमडले व ते आजपावेतो सुधारलेले नाही. याशिवाय पाण्याच्या पळवापळवीचे प्रकारही होत असतात. काही भागांत चार ते पाच तास पाणी राहते, तर काही ठिकाणी पॉवरफुल लोकप्रतिनिधींच्या भागासाठी इतर भागांच्या पाण्यावर डल्ला मारला जातो. सिडको, हडकोच्या नागरिकांचे पाणी असेच चार ठिकाणांहून पळवले जात असल्याने त्यांची 10 एमएलडीची तूट भरून येऊच शकत नाही.
जायकवाडीतून औरंगाबादसाठी पूर्ण क्षमतेने आणि मागील दोन महिन्यांपेक्षा जादा पाण्याचा उपसा होत असतानाही टाक्या भरणे व पाणी सोडणे याचे काडीचे नियोजन नसल्याने शहरातील पाणीपुरवठय़ाचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली नाही तर शहरवासीयांचा त्रास सुरूच राहणार आहे.
हसरूलचे पाणी असूनही बोंब
सिडको-हडकोचे पाणी पळवले जात असल्याने त्या भागात पाण्याची ओरड आहे. इतर भागांत वेळापत्रकाचे तीनतेरा वाजवल्याने पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे गतवर्षीसारखी पाण्याची टंचाई यंदा नाही. या वर्षी तर हसरूल तलावातील 5 एमएलडी पाणी रोज मनपाच्या मदतीला उपलब्ध आहे. त्यातून शहरातील तब्बल 18 वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. तरीदेखील शहराच्या इतर भागाला 150 एमएलडी पाण्याचे योग्य वितरण करताना मनपाला साफ अपयश आले आहे.