आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

469 कोटींत भागू शकेल 253 दिवसांची पाण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जायकवाडी धरणावरील ताण कमी करण्यासाठी हर्सुल आणि सावंगी पाणलोट क्षेत्रावर 469 कोटी रुपये खर्च करून शिरपूर पॅटर्नचा अवलंब केल्यास शहराला जवळपास 52 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. शहराची वार्षिक गरज 75 दलघमी एवढी असून हर्सुल व सावंगी तलावातून 253 दिवस पुरेल एवढे पाणी मिळू शकेल, असा दावा शनिवारी ‘पाणीकट्टा’ चर्चासत्रात करण्यात आला.

‘कडा’चे सहायक अभियंता अरुण घाटे यांनी औरंगाबाद व परिसराच्या पाणीपुरवठय़ासाठी पर्यायी उपाययोजना तयार केली आहे. या योजनेचे सादरीकरण त्यांनी जलतज्ज्ञांसमोर पाणीकट्टा उपक्रमाद्वारे केले.

औरंगाबादच्या पंधरा लाख लोकसंख्येला दररोज प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी लागते. म्हणजेच शहराची वार्षिक गरज 75 दलघमी एवढी आहे. ही गरज नजीकच्या भविष्यात 100 दलघमीपर्यंत वाढणार आहे. पाणीपुरवठा योजना एकाच स्रोतावर अवलंबून असणे योग्य ठरत नाही. औरंगाबाद व परिसरात सात पाणलोट क्षेत्रे आहेत, ज्यांना पावसाळ्यामध्ये शुद्ध पाणी मिळते. या पाणलोट क्षेत्रांचे एकूण क्षेत्रफळ 642 चौरस किमी आहे. या पाणलोट क्षेत्रात 672 मिमी पाऊस झाल्यास 30 टक्के पाणी वजा जाता 302 दलघमी उपलब्ध होते. फक्त हर्सुल आणि सावंगी तलावाच्या पाणलोट क्षेत्रावर शिरपूर पॅटर्न राबवल्यास जवळपास 52 दलघमी पाणी मिळेल, असा दावा घाटे यांनी केला.

33 दलघमीसाठी 302 कोटी : हर्सुलमध्ये 130 बंधारे बांधण्यास 26 कोटींचा खर्च येतो, तर खोदकामासाठी 276 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे यावर 302 कोटी रुपयांचा खर्च केल्यास 33 दलघमी पाणी साठा होऊ शकतो. भूसंपादन आणि पुनर्वसनाचा खर्च येणार नाही. या फॉर्म्युल्यामुळे औरंगाबादची तहान भागवण्यास महत्त्वाची मदत मिळणार असल्याचे घाटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. पाणीकट्टा बैठकीस जलतज्ज्ञ माधवराव चितळे, ई. बी. जोगदंड, डॉ. एस. बी. वराडे, प्रा. प्रदीप भलगे, प्रदीप मान्नीकर, दत्ता देशकर, दिलीप यार्दी, गजानन देशपांडे, प्रा. रमेश पांडव आदींची उपस्थिती होती.

शिरपूर पॅटर्न
सावंगी तलावाचे क्षेत्र 155 हेक्टर आहे. त्याची खोली 8 मीटरने वाढवल्यास 12.4 दलघमी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होईल. सावंगीच्या पाणलोट क्षेत्रात 84 किमी लांबीचे नाले आहेत. यावर शिरपूर पद्धतीचे 100 बंधारे बांधल्यास 4.20 दलघमी पाणीसाठा मिळेल. सावंगी तलावाची सध्याची क्षमता 2.4 दलघमी आहे. ती 19 दलघमीपर्यंत वाढेल.

असा होईल खर्च
सावंगी क्षेत्रासाठी 169 कोटींचा खर्च येईल. एक शिरपूर बंधारा बांधण्यासाठी साधारणत: वीस लाख रुपयांचा खर्च येतो. 100 बंधार्‍यांसाठी वीस कोटींचा खर्च येईल. खोदकामासाठी 149 कोटी खर्च होतील. एकूण 169 कोटी रुपये सावंगी क्षेत्रासाठी खर्च केल्यास 19 दलघमी पाणी मिळू शकते.

असे साचेल पाणलोट क्षेत्रात पाणी
पाणलोटाचे नाव क्षेत्र उपलब्ध होणारे पाणी सध्याचा साठा
हर्सुल तलाव 71 किमी 33.4 दलघमी 5 दलघमी
सावंगी तलाव 41 किमी 19.30 दलघमी 2.5 दलघमी

33 दलघमी पाणी अडवणे शक्य
हर्सुलच्‍या 71 किमी पाणलोट क्षेत्रात 33 दलघमी पाणी अडवणे शक्य आहे. 127 हेक्टरच्या तलावाचे 7 मीटर खोदकाम केल्यास 9 दलघमीचा अतिरिक्त पाणीसाठा होईल. तसेच हसरूलच्या वरील सात लहान तलावांचे 175 हेक्टर क्षेत्राचे 7 ते 8 मीटर खोलीकरण केल्यास 14 दलघमी पाणीसाठा मिळेल. हसरूलच्या पाणलोट क्षेत्रात 104 किमी लांबीचे लहान लहान ओढे आहेत. त्यावर शिरपूर पद्धतीचे 130 बंधारे बांधल्यास 5.46 दलघमी पाणीसाठा मिळेल.