आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस हजार लोकांना पुरेल एवढे पाणी जाते वाया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडी धरणातून पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी दररोज 145 एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी शहराची तहान भागवण्यासाठी 141 एमएलडी पाणी सोडले जाते. मात्र प्रत्यक्ष नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचते केवळ 115 एमएलडी पाणी. मग 26 एमएलडी पाणी मुरते कुठे? तर या प्रश्नाचे उत्तर जागोजागी वाहिन्यांमध्ये असलेल्या गळत्या आणि कायम झिरपत असणारे व्हॉल्व्ह असे देता येईल. हेच 26 एमएलडी पाणी वचतीचे पर्याय पालिकेने शोधले तर ते दररोज 30 हजार लोकांची तहान भागवू शकते. एकीकडे दोन दिवसांआड पाणीपुरवठय़ाचा कटू निर्णय घ्यावा लागत असताना वाहिन्यांना लागलेली गळती रोखण्याचे प्रयत्न का केले जात नाहीत, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरात येईपर्यंत त्यातील 30 एमएलडी पाणी वाटेतच मुरते. चार एमएलडी पाणी वाटेतील ग्रामपंचायती व कारखान्यांना दिले जाते, तर उर्वरित 26 एमएलडी पाणी जागोजागी असलेल्या गळत्या, व्हॉल्व्ह या ठिकाणातून भूगर्भात गडप होते. स्वत: आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीच तशी कबुली दिली आहे. उपलब्ध पाणी समान प्रमाणात मिळावे यासाठी शहरात जागोजागी बसवण्यात आलेले बायपास बंद करण्याचे आदेशही त्यांनी आज दिले .
असा होतो पाण्याचा प्रवास (13 ऑगस्टची आकडेवारी)
जायकवाडी येथून उपसा - 145 एमएलडी
फारोळा केंद्रापर्यंतची गळती- 12 एमएलडी
यापैकी 2 एमएलडी कारखाने, 2 एमएलडी पाण्याचा धनगाव, इंदूरवाडी आणि ढोरकीन या गावाला पुरवठा.
फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत होणारी गळती- 20 एमएलडी (काही लिकेजेस व व्हॉल्व्हमधून ही गळती होते)
नक्षत्रवाडी ते रेल्वेस्थानकापर्यंत रस्त्यावर होणारी गळती- 8 एमएलडी
एकूण गळती- 26 एमएलडी
शहराला मिळणारे पाणी- 115 एमएलडी
अंतर्गत पुरवठय़ात होणार्‍या गळतीचा यात समावेश नाही. त्याचे आकडे पालिका अधिकार्‍यांकडेही नाहीत.
सध्याची स्थिती
130 एमएलडी पाणी मिळाले तर एक दिवसाआड पाणी देणे शक्य आहे.
हर्सूल तलावातून मिळणारे 6 एमएलडी पाणी गेल्या तीन दिवसांपासून बंद.
रोजाबाग आणि नहर-ए-अंबरी येथून चार एमएलडी मिळणारे पाणी बंद.
येथे मिळते दिवसाआड
गुलमंडी, नागेश्वरवाडी, औरंगपुरा, जुनाबाजार, पुंडलिकनगर, गारखेडा, रेल्वेस्थानक, बन्सीलालनगर, पदमपुरा.
दोन दिवसांआड पाणी
सिडको-हडकोचा सर्व परिसर, हर्सूल, नारेगाव, विद्यापीठ परिसर.
सध्या दोन दिवसांआड पुरवठय़ाची गरज नाही - नाथसागरात मुबलक पाणी असल्यामुळे पाणी कपातीची गरज नाही, असे मीच पूर्वी म्हणालो होतो. मात्र आता उपसाच कमी झाला, शिवाय हर्सूल तलावही आटला. त्यामुळे बायपास बंद करून दिवसाआड पाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त