आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च्भ्रूंच्या वस्तीत पाण्यासाठी हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यंदा बर्‍यापैकी पाऊस झाल्यानंतर आणि अख्ख्या शहराला किमान पुरेसे पाणी मिळत असताना उच्चभ्रूंच्या एका वसाहतीत पाण्यासाठी रहिवाशांचे हाल होत आहेत. न्यू र्शेयनगर परिसरातील ‘कासलीवाल हेरिटेज’मध्ये अनेक घरांमध्ये महापालिकेचे पाणीच येत नाही, तर काही घरांना अध्र्या तासापेक्षा जास्त पाणी मिळत नाही. आश्चर्य म्हणजे पालिकेच्या अधिकार्‍यांना वारंवार सांगूनही तब्बल सात महिन्यांपासून या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून, सुमारे शंभर लोकांना पाणी असूनही पाणीटंचाईचा जबर फटका बसत आहे.

दशमेशनगरातील शिव मंदिराच्या मागील भागात असलेल्या ‘कासलीवाल हेरिटेज’ या वसाहतीमध्ये मार्चपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होत होता. मात्र, मार्चनंतर पाणीपुरवठा अचानक विस्कळीत झाला आणि अनेक घरांमध्ये कमी दाबाने पाणी येऊ लागले. भरउन्हाळ्यात पाणीपुरवठा अजून क्षीण झाला. आता पावसाळा संपला तरी आणि या वर्षी चांगला पाऊस पडूनही सोसायटीत होणार्‍या पाणीपुरवठय़ाची स्थिती न सुधारता अधिकच चिंताजनक बनल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात ‘कासलीवाल हेरिटेज सोसायची’चे अध्यक्ष व उद्योजक श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, वसाहतीतील 12-13 घरांमध्ये पालिकेच्या पाण्याचा थेंबही येत नाही. माझ्यासह सुमारे 10-15 घरांमध्ये दोन दिवसांआड 10-15 मिनिटेच पाणी येते. काही घरांमध्ये कसेबसे अर्धा तास पाणी येते. हा प्रश्न अनेक महिन्यांपासून तीव्र बनत चालला असला तरी यावर कोणीही तोडगा काढलेला नाही. नगरसेवक राजू वैद्य यांनाही अनेक वेळा सांगितले; परंतु परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही, असे कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. येथील रहिवासी व व्यावसायिक अनिल लोखंडे यांनीही पालिकेचे पाणी येत नसल्यामुळे कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

दिवस काढावे लागतात टँकरवर
‘कासलीवाल हेरिटेज’मध्ये राहणार्‍या रहिवाशांना एका आठवड्यात दोनदा तरी टँकर मागवावे लागते, नाहीतर कूपनलिकेवर अवलंबून राहावे लागते. त्याशिवाय वसाहतीमध्ये जिथे कुठे पाणी आले असेल, तिथून पाणी भरावे लागते. त्यामुळे ज्या दिवशी या भागांत पाणी येते, त्या दिवशी इकडून-तिकडून पाणी भरण्यासाठी झुंबड उडताना दिसते. मात्र, याचे पालिकेला कुठलेच सोयरसुतक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.