आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा दुष्काळाच्या वाटेवर; 1600 गावांत 555 टँकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाड्याची वाटचाल यंदा त्याच दिशेने सुरू आहे. गतवर्षी मे महिन्यात 8 जिल्ह्यांत अडीच हजारांवर टँकर सुरू होते. यंदा जुलै महिन्यात 555 टँकर सुरू असून दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. लवकर पाऊस न झाल्यास दिवसेंदिवस चित्र भीषण होऊ शकते. शिवाय गुरांसाठी पाणी, वैरणीचा प्रश्न निर्माण होत आहे. संभाव्य बिकट परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवार विभागीय आयुक्तालयात विभागातील 8 जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बैठक होत आहे.

या बैठकीत पुढील काही महिन्यांचे नियोजन केले जाईल. सध्या फक्त टँकरची संख्या आणि त्यावर अवलंबून गावांच्या संख्येचा विचार होत असला, तरी प्रत्यक्षात चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

चारा आणायचा कोठून हा प्रश्न असून त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्याच्या अन्य भागांतून चारा आणावा लागेल, असे दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, तो आणायचा कसा, याचे नियोजन करावे लागणार आहे. कमी पाण्यात चांगला चारा येणार्‍या पिकांचे वाण मोफत उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी पूर्वीच केली आहे.

मराठवाड्याला दिलेले 66 कोटी बँकांत पडून
गारपीट व अवकाळी पावसाने मराठवाड्याच्या 8 जिल्हय़ांत 994 कोटींचे नुकसान झाले. मदतीसाठी शासनाने तीन टप्पे घेतले. मात्र यातील 66 कोटींचा निधी बँकांमध्ये अजून पडून आहे. एकीकडे शेतकर्‍यांना पैसे मिळत नाही, तर दुसरीकडे तो वाटण्यास यंत्रणेला वेळ नाहीत, असे चित्र आहे. 22 फेब्रुवारी ते मार्चच्या मध्यापर्यंत विभागाला गारपिटीचा तडाखा बसला. यात 8.05 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले. दोन हजार कोटींवर नुकसानीचा आकडा जात असतानाही शासनाने 994 कोटीच दाखवला. यातील 903 कोटींचे वाटप झाले.