आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण उशाला अन् कोरड घशाला: 170 गावांसाठी आता दोनशे टँकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- आशिया खंडात सर्वाधिक मातीचे मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या पैठण तालुक्यात यंदा पाणीटंचाईने टँकरचा उच्चांक मोडला असून कोट्यवधी रुपये खर्चून कार्यान्वित केलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या.

दहा मंडळांतर्गत १८८ गावांपैकी १७० गावांत पाण्याचे "दुर्भिक्ष' निर्माण झाल्याने तीन लाख अठरा हजार ४७१ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनावर २०० टँकर सुरू करण्याची नामुष्की ओढवली आहे. आज रोजी १७० गावांतील नागरिकांची भिस्त टँकरवर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांवर "धरण उशाला अन् कोरड घशाला' असे म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
यंदा प्रथमच मागील पाणीटंचाईचा आलेख मोडला जाऊन टँकरने दोन शतके ओलांडली. सलग आठ- दहा वर्षांपासून पर्जन्यमानात घट झाल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरी, नदी - नाले कोरडी राहून नागरिकांवर हिवाळ्यापासूनच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

तालुक्यातील एकतुनी, खेर्डा, दावरवाडी हे लघुप्रकल्प तीन वर्षांपासून कोरडे पडले. सर्व बुडीत क्षेत्र वेड्याबाभळी बेशरमाच्या झाडांनी वेढले गेले. या प्रकल्पात जवळपास बारा गावांचे कोट्यवधी रुपये खर्चून खोदलेल्या पाणीपुरवठा विहिरी, पाइपलाइन कुचकामी ठरल्या.

ऑगस्ट- सप्टेंबरपासून तालुक्यात टँकर सुरू झाले. तूर्तास १८८ पैकी १७० गावांत २०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली. तालुक्यातच मोठे जायकवाडी धरण असताना पाण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने रोष व्यक्त होतो.

पाण्यासाठी स्पर्धा
प्रत्येक गावांत बालकांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व जण पाण्यासाठी चौकाचौकांत हंडे, ड्रम घेऊन टँकरची प्रतीक्षा करतात. १२ हजार लिटर क्षमतेचे टँकर दहा मिनिटात रिकामे होते. टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही असे, पाणीपुरवठा शाखा अभियंता सुधाकर काकडे यांनी सांगितले.