आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर भरूनही पाणी मिळेना, उल्कानगरी भागात तीव्र पाणीटंचाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उल्कानगरी (वॉर्ड क्रमांक ९८) अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. महानगरपालिका नालेसफाई करत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ड्रेनेजलाइन फुटलेली असल्यामुळे रात्री डासांचा त्रास वाढला आहे. तसेच काही जणांना नळ कनेक्शन मिळाले तर काहींना पाठपुरावा करूनही ते मिळत नसल्याने पाण्याविना हाल होत आहेत.
मागील २० वर्षांपासून नळ कनेक्शनसाठी येथील नागरिक महापालिका आता औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे मागणी करत आहेत. पण त्याचा काही फायदा झाला नाही. मालमत्ता कर भरूनही पाणी मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुख्य जलवाहिनी जवळपास ३५० फूट दूर आहे. तेथून पाइपलाइन टाकण्यासाठी खर्च देण्याची तयारी दाखवली तरी कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. शिवाय या भागात ड्रेनेजलाइन नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने लक्ष देऊन नळ द्यावे, अशी मागणी वैजनाथ आघाव यांनी केली आहे.
...अन्यथा उपोषणाला बसणार
नळ कनेक्शन मिळत नाही. इतर इमारतींना नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. कनेक्शन मिळवण्यासाठी महानगरपालिका, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी यांच्याकडे लेखी अर्ज केले होते. त्यानंतर जागेचा सर्व्हेसुद्धा करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बोअर आटले आहेत. त्यामुळे विकतचे टँकर आणावे लागतात. बोअरचे पाणी भरण्यासाठी पहाटे उठावे लागते तेव्हा कुठे तीन ते चार बादल्या पाणी मिळते. नळ कनेक्शन दिल्यास मनपा आयुक्तांना भेटून त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. यासंदर्भात लेखी तक्रार करण्याची तयारी नागरिकांनी केली अाहे. दरम्यान, समांतर योजनेतील अधिकारी नळ कनेक्शन देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. अशा समस्यांमुळे उल्कानगरीतील नागरिक त्रस्त झाले आहेत.
विचार करू
उल्कानगरी भागातील नागरिक मालमत्ता कर वेळेवर भरत असतील तर पाइपलाइन टाकण्यासाठी काही अडचण नाही. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी विचार करण्यात येईल. त्यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्याकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करतो.
राहुल मोतियळे, जनसंपर्क अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी.
...तरीही नळ नाही
वीसवर्षांपासून बोअरचे पाणी वापरत आहोत. उन्हाळ्यात प्रचंड हाल होत आहेत. अनेकदा दुसऱ्यांच्या घरातून पाणी आणावे लागते.अधिकारी नळ कनेक्शन देत नाहीत.
वैजनाथ आघाव, रहिवासी.